न झालेली अॅन्टिजन चाचणी किट खरेदी वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:35+5:302021-06-18T04:17:35+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किटची खरेदी वादाच्या ...

न झालेली अॅन्टिजन चाचणी किट खरेदी वादात
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किटची खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तातडीने खरेदी करताना विहित प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा ठपका ठेवत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांना नोटीस काढण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अॅन्टिजन टेस्ट वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर किटची गरज आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही तातडीने किट खरेदी करून चाचण्या सुरू करण्याच्या सूचना मंगळवारच्या बैठकीत दिल्या.
त्यानुसार डॉ. कुंभार यांनी मेल आणि व्हॉटसअॅपवरून दर मागवून खरेदी प्रक्रिया सुरू केली. हाफकिनच्या दराप्रमाणे १ लाख अॅन्टिजन चाचणी किट आणि ५० हजार व्हीटीएम चाचणी किट घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. ८९ रुपयांप्रमाणे अॅन्टिजन चाचणी किटचे ८९ लाख रुपये होतात. तर व्हीटीएमचे किट साडेसहा लाखांच्या पुढे जातात.
या दरासह पुरवठादारही बुधवारी जिल्हा परिषदेत दाखल झाले. परंतु यातील दर एकमेकांना कळले की सांगितले यावरून काम वाटपाबाबत वाद झाला. हा वाद जिल्ह्यातील नेत्यांपर्यंत गेल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी या प्रकरणाचा दुसरा अंक सुरू झाला. आपण सर्वात कमी दराची निविदा भरली असल्याने हे काम आपल्याला मिळावे, अशी भूमिका पुरवठादाराने घेतले तेव्हा कालची प्रक्रिया रद्द केल्याचे त्यांना सांगण्यात आले. कारण विचारले असता ती चुकीची प्रक्रिया असल्याचे सांगितल्यानंतर मग ज्यांनी प्रक्रिया राबवली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदस्य मनोज फराकटे यांनीही अशाच आशयाचे निवदेन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांना दिले. यानंतर माने यांनी डॉ. उषादेवी कुंभार यांना नोटीस काढून खुलाशाची मागणी केली आहे.
हे किट खरेदी करताना विहिती निविदा प्रक्रिया न राबवल्याप्रकरणी ही नोटीस काढण्यात आली असून याबाबत सोमवारपर्यंत खुलासा मागवण्यात आला आहे.
चौकट
दिवसभर जिल्हा परिषदेत हीच गडबड
गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत हीच गडबड सुरू होती. हे प्रकरण नेत्यांपर्यंत गेल्यामुळे सकाळपासून तातडीने हालचाली सुरू झाल्या. एकीकडे किट तर तातडीने पाहिजेत आणि अशात हा घोळ यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अजयकुमार माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, डॉ. कुंभार यांच्या एकापाठोपाठ बैठका सुरू होत्या. यातून नवी प्रक्रिया राबवून संध्याकाळी १० लाख किटची ऑर्डरही देण्यात आली. संध्याकाळनंतर सामान्य प्रशासन विभागात हालचाली वाढल्या आणि जिल्हा परिषद सुटताना डॉ. कुंभार यांना नोटीस काढण्यात आली.