अपंग भरतीवरून गदारोळ; सभा तहकूब
By Admin | Updated: July 21, 2015 01:04 IST2015-07-21T01:04:41+5:302015-07-21T01:04:41+5:30
महापालिकेत वादळी चर्चा : भरती प्रक्रियेसाठी पंधरा दिवसांची प्रशासनाला नोटीस; आयुक्तांचा निषेध

अपंग भरतीवरून गदारोळ; सभा तहकूब
कोल्हापूर : गेली आठ महिने रखडलेली अपंग नोकरभरती येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करा, कुष्ठरोगींना ठरलेले मानधन द्या, अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा देत, सोमवारची महापालिकेची सभा तहकूब करण्यात आली. प्रशासनावर ताशेरे ओढत तीन तास वादळी चर्चा झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या. बोगस दाखल्यावरून अपात्र ठरलेल्या नगरसेवकांमुळे रिक्त झालेल्या स्थायी व परिवहन सदस्यपदी नवीन नेमणूक टाळण्यासाठीच नगरसेवकांनी जाणीवपूर्वक सभा तहकूब केल्याची चर्चा महापालिकेत आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५५ लाख रुपयांची तरतूद करूनही कुष्ठरोगींना दरमहा एक हजार रुपयांचे वेतन दिले जात नाही, तसेच अपंगांसाठीच्या रिक्त जागी अर्ज मागवून आठ महिने उलटले तरी प्रशासनाने पुढील कारवाई केलेली नाही. समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांकडे पाहण्यास प्रशासनास वेळ नाही, अशा संवेदनहीन प्रशासन व आयुक्तांचा निषेध करीत आजची सभा तहकूब करण्याची घोषणा विविध विषयावर मंजुरीसह तीन तासांच्या चर्चेनंतर गटनेता राजेश लाटकर व शारंगधर देशमुख यांनी केली.
सुरुवातीस स्थायी, परिवहन व महिला बालकल्याण, परिवहन समिती सदस्य असलेले अनुक्रमे सचिन चव्हाण, रेखा आवळे, दिगंबर फराकटे यांच्या रिक्त जागी नवीन सदस्यांची नेमणुकीचा विषय सभेच्या शेवटी घेण्यात येईल, असे महापौर डकरे यांनी स्पष्ट केले. महापालिका कायद्यानुसार कुष्ठरोगींना सोयी पुरविण्याची तरतूद असूनही त्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासनावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा भूपाल शेटे यांनी दिला. अपंगांसाठी रिक्त जागी एक हजार अर्ज आले, मात्र प्रशासनास याकामी वेळ नाही. सहायक आयुक्त शीला पाटील यांचे याकामी दुर्लक्ष झाले असून, त्यांची चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची मागणी शारंगधर देशमुख यांनी केली. अपंग भरतीची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत राबविण्याची हमी उपायुक्त विजय खोराटे यांनी दिली.