निवडणूकसंबंधी सर्व प्रश्नांची उकल
By Admin | Updated: March 9, 2015 23:58 IST2015-03-09T01:11:42+5:302015-03-09T23:58:10+5:30
निवडणूक आयोग : सोळाशे प्रश्नांची खास पुस्तिका

निवडणूकसंबंधी सर्व प्रश्नांची उकल
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
निवडणूक ग्रामपंचायतीची असो की जिल्हा परिषदेची; ती लढविताना उमेदवारांपासून सामान्य माणसापर्यंत आणि राजकीय कार्यकर्त्यापासून ते निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनांत वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची (एफएक्यू - फ्रिक्वेंटली आस्कड क्वेशन्स) उत्तरे आता राज्य निवडणूक आयोगच देणार आहे. त्यासाठी खास पुस्तिका करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामध्ये तब्बल सोळाशे प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वच्छ, भयमुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याची संवैधानिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सदस्य संख्या निश्चित करणे, प्रभाग रचना करणे, मतदार याद्या करणे, प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविणे ही कार्यवाही पार पाडावी लागते. या सगळ्या निवडणुका गावपातळीवर लढविल्या जात असल्याने त्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग असतो. या प्रक्रियेसंदर्भात सर्वसामान्य जनता, निवडणूक अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या मनांत विविध प्रश्न असतात. त्याची उत्तरे देऊन कुणाच्याच मनात संदिग्धता राहू नये अशी एकरूप उत्तरे दिली जाणे आवश्यक असते. म्हणूनच निवडणूक आयोगाने असे प्रश्न एकत्रित करून त्यांची उत्तरे देण्यासाठी समितीच स्थापन केली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या पुस्तिकेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध कायद्यांची पुस्तके, भारत निवडणूक आयोगाचे प्रश्न, त्या त्या अधिकाऱ्यांचा निवडणूक कामकाजातील अनुभव या सगळ्यांचा आधार घेण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यात ‘यशदा’मध्ये कार्यशाळाही झाली आहे.
डॉ. श्रीकर परदेशी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त होते, तेव्हा त्यांनी महापालिकेच्या कामकाजाबद्दल माहिती देणारी अशी पुस्तिका काढली होती. आता त्यांनीच नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे ‘सारथी’ नावाची पुस्तिका प्रकाशित केली आहे. ती मोबाईल अॅपवर व पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध आहे. त्यामुळे तेच-तेच प्रश्न विचारायला येणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यातूनच निवडणूक कामासाठी अशा पुस्तिकेची कल्पना सुचली आहे.
अशी आहे समिती...
या समितीचे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी हे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (अप्पर मुद्रांक, मुंबई), बी. एम. कांबळे (उपमहानिरीक्षक, नोंदणी औरंगाबाद), संतोष पाटील (एमआयडीसी, नांदेड), दीपक नलवडे (उपजिल्हाधिकारी,कोल्हापूर) जगदीश मिनियार (सहायक आयुक्त, मनरेगा, नागपूर), उदय टेकाळे (उपायुक्त, पुणे महापालिका), कमलकिशोर फुटाणे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर), रवींद्र धुरजड (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती), रत्नाकर वाघमारे (उपायुक्त, नांदेड महापालिका) यांची समिती नियुक्त केली आहे. निवडणूक आयोगाचे अवर सचिव नितीन वागळे हे या समितीचे समन्वयक आहेत.
काय असेल पुस्तिकेत...
तीन मुले असतील तर तुम्ही निवडणूक लढविण्यास पात्र ठरू शकता का, चिन्हवाटपाचे नियम कसे आहेत, अर्ज दाखल करताना काय दक्षता घ्यायची, प्रभाग रचना नेमकी होते तरी कशी, निवडणुकीत काय केले म्हणजे तो गुन्हा ठरतो, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तिकेत असतील.
आम्ही सुमारे सोळाशे प्रश्नांची यादी तयार केली असून, त्यांतील निम्म्या प्रश्नांची उत्तरेही तयार केली आहेत. प्रत्येक उत्तराला कायद्याचा काय आधार आहे, हेदेखील देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सगळे काम झाल्यानंतर दोन महिन्यांत ते राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात येईल. आयोगातर्फे ही माहिती वेबसाईट व पुस्तिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध होईल.
- डॉ. श्रीकर परदेशी, अध्यक्ष, सातत्याने विचारल्या जाणाऱ्या
प्रश्नांची मसुदा समिती, राज्य निवडणूक आयोग, मुंबई