पोलीस कारवाईने ‘स्वप्नवेल’चा प्रश्न चर्चेत

By Admin | Updated: January 20, 2015 23:41 IST2015-01-20T21:28:41+5:302015-01-20T23:41:17+5:30

चंदगड तालुका : महसूल, वनविभागाने ठोस कार्यवाही करण्याची गरज

Discussion of 'Swapnavell' question by police action | पोलीस कारवाईने ‘स्वप्नवेल’चा प्रश्न चर्चेत

पोलीस कारवाईने ‘स्वप्नवेल’चा प्रश्न चर्चेत

नंदकुमार ढेरे - चंदगड -तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोेंगररांगेत वसलेल्या व निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या तिलारी परिसरात उदयास आलेल्या ‘स्वप्नवेल पॉर्इंट’ याठिकाणी ३१ डिसेंबरच्या रात्री चंदगड पोलिसांनी छापा टाकून बेकायदा पार्टी करणाऱ्या २४ जणांना अटक केली. चंदगड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ‘स्वप्नवेल’च्या एकू ण स्थापनेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्याचे काश्मीर असलेल्या पारगड, तिलारी परिसरात निसर्गाचे वरदान लाभले आहे. या ठिकाणी वनविभागाने कोदाळी वनव्यवस्थापन समितीच्या सहकार्याने ग्रीन व्हॅली पार्क, कोदाळीजवळील रातोबा पॉर्इंट विकसित केले आहे, तर अगदी जंगल कपारीत दरीच्या काठावर बशीर कोतवाल (बेळगाव) याने विकसित केलेला ‘स्वप्नवेल पॉर्इंट’, अशी ही निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण बनली आहेत. तिलारीपासून धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर कालव्याच्या समांतर रस्त्याने गेल्याने ६ किलोमीटर अंतरावर स्वप्नवेल पॉर्इंट हे स्थळ आहे. ज्या ठिकाणी हा पॉर्इंट विकसित झाला आहे, हे ठिकाण परदेशातही नसावे. खोल दरी, वर्षभर फेसाळत पडणारे धबधबे, गर्द झाडी, थंडगार हवा, असे नयनरम्य वातावरण येथे आहे .
बशीर कुतबुद्दीन कोतवाल (रा. जाधवनगर, बेळगाव) याने हा पॉर्इंट विकसित केला आहे. मात्र, या पॉर्इंटच्या सभोवताली साधारण आठ एकर जागा वनविभागाची आहे. असे असताना मध्येच स्वप्नवेल पॉर्इंट म्हणून विकसित केलेली जागा कोतवाल याने कशी खरेदी केली? या जागेचा मूळ मालक कोण? जागा केव्हा खरेदी केली? ती कायदेशीर आहे का? इतर खात्याच्या परवानगी घेतल्या आहेत का? असे अनेक प्रश्न चंदगड पोलिसांच्या कारवाईनंतर प्रकाशझोतात येत आहेत.
‘स्वप्नवेल’ हा नयनरम्य परिसर असल्याने याठिकाणी येणाऱ्या तालुक्यातील पर्यटकांसह कर्नाटक (बेळगाव) व गोव्यातील पर्यटकांची संख्या मोठी आहे. यामध्ये बेळगाववरून येणाऱ्या महाविद्यालयीन युवक-युवतींची संख्या मोठी आहे. याठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय असल्याने येथे पर्यटनाच्या नावावर अनेक गैरप्रकार चालत असल्याची चर्चा आहे. लोकवस्तीच्या संपर्कापासून जंगलात निर्जनस्थळी गोवा व कर्नाटक सीमेलगत असल्याने या पर्यटनस्थळाचा वापर अवैध धंद्यांसाठीही करण्यात आला आहे का, याबाबतही सखोल चौकशीची गरज आहे.
३१ डिसेंबरला रात्री पार्टीत दंग असलेल्या २४ जणांना अटक करून चंदगडचे पोलीस निरीक्षक अंगद जाधवर यांनी याठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध प्रकारांना वाचा फोडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी, मंडळींतून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

वाटेबाबत न्यायालयात वाद : तळवडेकर
‘स्वप्नवेल’ची जागा जरी मालकाने आपल्या नावावर करून घेतली असली तरी त्याठिकाणी जाणारी वाट ही वनविभागाच्या जागेतूनच जाते. ही वाट २००२ साली वनविभागाने बंद केली आहे. त्याबद्दल कोतवालाने या वाटेचा वाद न्यायालयात दाखल केला आहे. परंतु, वनविभाग आपल्या मताशी ठाम आहे, अशी माहिती पाटणे विभागाचे वनक्षेत्रपाल एस. बी. तळवडेकर यांनी दिली.

पोलिसांनी कारवाई थांबवू नये
‘स्वप्नवेल’ या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली आणखी काय गैरप्रकार चालतात का? पर्यटनाच्या नावाखाली याठिकाणी कोण-कोण येते, याची चौकशी चंदगड पोलिसांनी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
‘स्वप्नवेल’च्या सभोवती वनविभागाची जागा आहे; पण मध्येच कुतबुद्दीन याने कशी काय जागा खरेदी केली, याबाबत वनविभाग व महसूल विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

Web Title: Discussion of 'Swapnavell' question by police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.