राजकारण्यांनीच काम अडविल्याची जनतेत चर्चा
By Admin | Updated: August 22, 2014 22:47 IST2014-08-22T22:43:17+5:302014-08-22T22:47:40+5:30
किल्ले रसाळगड : मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने शिवप्रेमी नाराज

राजकारण्यांनीच काम अडविल्याची जनतेत चर्चा
खेड -- श्रीकांत चाळके --तालुक्यातील किल्ले रसाळगडावर जाण्यास शिवप्रेमींना मोकळीक मिळावी, यासाठी रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २१ फेब्रुवारी २०१४ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, पाच महिने उलटल्यानंतरही पायथ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. १० लाख रूपये खर्चाचे हे काम आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप हे काम सुरू झाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांनी ‘क’ वर्ग पर्यटन विकास या योजनेअंतर्गत घेरारसाळगड रस्ता आणि गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी मंदिर येथे स्वागत कमान उभारण्याच्या २४ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. यापैकी घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये खर्चाच्या कामाला मंजुरी दिली आहे. हे काम ८०० मीटर अंतराचे आहे.
पायथ्यापर्यंत जाणारा हा रस्ता घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी या वाड्यांसाठीही जोडण्यात येणार आहे़ हा रस्ता वन विभागाच्या मालकीच्या जमिनीतून जाणार असल्याने वन विभागानेही त्याला मंजुरी दिली आहे. हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार आहे़ आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक होते़ मात्र, प्रत्यक्षात या कामाला सुरूवात झालेली नाही. गडाच्या दुरूस्तीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आजही ते अर्धवट स्थितीत असल्याने शिवप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरातत्व आणि वन विभागाचे अधिकारी या कामाबाबत वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याने याविषयी आजही संभ्रम असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे.
गडावरील ऐतिहासिक गोष्टींचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घेरारसाळगड येथील रस्त्याचे बांधकाम करण्याच्या ९ लाख ९९ हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. गडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या या रस्त्यामुळे घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी, बौध्दवाडी व भुतराय धनगरवाडी यांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिली. दरम्यान, हे काम रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांच्या परवानगीनेच सुरू करण्यात येणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे काम सुरू होणे आवश्यक असल्याने तसे प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे़