देवस्थान समितीत अपहार झाल्याची चर्चा
By Admin | Updated: May 24, 2014 00:59 IST2014-05-24T00:49:47+5:302014-05-24T00:59:52+5:30
दुजोरा नाही : सावंत याला पोलीस कोठडी

देवस्थान समितीत अपहार झाल्याची चर्चा
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्याने एक लाख ३९ हजार रुपयांचा अपहार केल्याची चर्चा आहे, परंतु त्याबाबत समितीच्या सूत्रांकडून दुजोरा मिळू शकला नाही. अशा प्रकारचा अपहार झाला असून त्याबाबत जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे काहींनी वृत्तपत्रांना कळविले. त्यानुसार पोलिसांकडे चौकशी केली असता अशा प्रकारची तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. सध्या समितीतील कर्मचारी प्रल्हाद सावंत यांनी दागिन्यांचे मोजमाप करताना त्यातील एक डबी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास पोलिसांनी अटक केली असून त्यास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही घटना २२ एप्रिलला घडूनही त्यासंबंधीचा गुन्हा दाखल होण्यास तब्बल महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे अपहाराबद्दलही तसेच होण्याची शक्यता व्यक्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीचे सचिव हणमंतराव सूर्यवंशी व लेखापाल एस. एस. साळवी यांना समितीचे पैसे बँकेतून काढण्याचे अधिकार होते. त्याच्या काळात ९ लाख ९६ हजार रुपये या दोघांनी काढले आहेत. परंतु त्यातील १ लाख ३९ हजार रुपये बँकेत भरलेले नसल्याचे समजते. ही रक्कम कुणी भरायची यावरून दोघांत तू..तू..मैं..मैं.. सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या रक्कमेचा अपहार झाल्याची चर्चा आहे. देवस्थान समितीचा निधी या अधिकार्यांनी जास्त दराने व्याज मिळेल अशा ठेवीमध्ये गुंतवण्याऐवजी ती रक्कम बचत खात्यावर ठेवण्यात येत होती. त्यामुळे समितीचे व्याजाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. यासंबंधी समितीच्या सदस्या पद्मा तिवले यांच्याशी संपर्क साधला असता तसे काही घडले नसल्याचे सांगितले. व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी मंदिरात कॅशचा सगळा व्यवहार बँकेमार्फत होतो. साडी, लाडू विक्रीतून आलेली कॅश त्याचदिवशी जमा होते. त्यामुळे एवढी रक्कम शिल्लक असण्याचे अथवा त्याचा अपहार होण्याची शक्यता नाही, असे सांगितले. समितीचे सहाय्यक सचिव व लेखापाल असलेले साळवी यांनाही त्यासंबंधी विचारले असता त्यांनी असे काही घडले नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)