'सीपीआर'च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावा

By Admin | Updated: November 22, 2015 00:33 IST2015-11-22T00:13:08+5:302015-11-22T00:33:58+5:30

चंद्रकांतदादा पाटील : 'सीपीआर'च्या मागण्या येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करू

Discipline of CPR employees | 'सीपीआर'च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावा

'सीपीआर'च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावा

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या प्रलंबित मागण्या येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देत रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी यांच्यात सुधारणा करा, त्यांना शिस्त लावा, अशा सूचना शनिवारी दिल्या.
येथे ताराबाई पार्क शासकीय विश्रामगृहात सायंकाळी पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांतदादा पाटील यांनी, ‘सीपीआर’च्या ज्या मागण्या आहेत त्यांची यादी करा, मला द्या, निधीसाठी मी पाठपुरावा करतो. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करा, अशी सूचना रामानंद यांना केली. दरमहा ‘सीपीआर’च्या प्रश्नांसंदर्भात बैठक घेऊ, असे सांगितले.
डॉ. रामानंद म्हणाले, साडेतीन महिन्यांपासून हे प्रभारी अधिष्ठाता पद आले आहे. मधल्या काळात झालेल्या अधिष्ठाता यांच्या बदल्यांमुळे ‘सीपीआर’च्या रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. सध्या प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ही पदेही रिक्त आहेत. त्याचबरोबर लिपिक, तांत्रिक पदे व नर्सिंग पदे रिक्त आहेत. शेंडा पार्क येथे १२ कोटी रुपयांच्या दोन इमारती बांधून तयार आहेत. बरीच जागा शिल्लक आहे. मूलभूत सुविधांसाठी ७२ लाखांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.
‘सीपीआर’च्या आवारात ११ अतिक्रमणे आहेत. त्यांपैकी दहा अतिक्रमणे ही बेकायदेशीर तर एक न्यायप्रविष्ट आहे. आवारातील पार्किंग हटविणे गरजेचे आहे. शासनाकडून २५ सीसीटीव्ही व २० वॉकीटॉकी संच मंजूर झाले आहेत. सीसीटीव्ही बसविले आहेत. अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत करावी. रुग्णांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी पासची पद्धत सुरू करण्याचा विचार आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून २९ लाख रुपये व्हेंटिलेटरसाठी आले आहेत. अजूनही व्हेंटिलेटरसाठी निधी आवश्यक आहे. शिकाऊ डॉक्टरांच्या स्वतंत्र खोल्यांच्या व्यवस्थेसाठी निधी द्यावा. हृदयशस्त्रक्रिया विभागातील तीन हार्ट सर्जरी व कॉर्डिओलॉजी ही पदे भरली आहेत. ट्रामा सेंटरसाठी शासनाकडून पाच कोटी २१ लाख रुपयांचा निधी आला आहे. त्यासाठी अद्ययावत मशीन मिळावे, असे रामानंद यांनी सांगितले.
राजेश क्षीरसागर म्हणाले, सहा वर्षांपासून आहे त्याच समस्या आहेत. निधी नाही; त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी निधीची पूर्तता करून समस्या सोडवाव्यात.
अमल महाडिक म्हणाले, ‘सीपीआर’मधील कर्मचारी वेळेवर कामाला येत नाहीत. त्यासाठी प्रशासनाने वेळेचे बंधन घालावे. व्हेंटिलेटर बंद आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी ‘सीपीआर’मध्ये दिशादर्शक फलक लावावेत. रेबीज लसही उपलब्ध करावी. अत्यावश्यक सेवा म्हणून २४ बेडची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा करू.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव यांनी ‘सीपीआर’ परिसरातील अतिक्रमणे काढावीत, अंतर्गत रस्ते व्हावेत, एटीएम मशीन बसवावे, प्रसूतिगृहासाठी खाटांची संख्या वाढवावी. ८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने कायम करावे, शासकीय कर्मचाऱ्यांची बिले शासनाने तत्काळ द्यावीत, असे सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वीजपुरवठा खंडित
४शासकीय विश्रामगृहामधील राजर्षी शाहू सभागृहातील विद्युत पुरवठा ‘सीपीआर’च्या या बैठकीवेळी खंडित झाला.
४पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्धा तास विद्युत पुरवठा होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सर्वजण जुन्या शासकीय विश्रामगृहात आले.
४ही बैठक तब्बल अर्धा तास उशिरा झाली.

Web Title: Discipline of CPR employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.