सरुड : गेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे व धरणात ९९.८६ टक्के इतका पाणीसाठा झाल्याने चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
सोमवारी धरणातून ८२०५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात आला आहे. परिणामी वारणा नदीचे पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडले असून, धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणात सध्या ३४.३६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली असून, सध्या धरणात प्रतिसेकंद ५४८२ क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे. धरणातील एकूण पाणीसाठा व पाण्याची होणारी आवक पाहता पाटबंधारे विभागाने सोमवारी सकाळी १० वाजता धरणातील वीजनिर्मिती गृहातून १३७७ क्युसेक, तर धरणातील सांडव्यातून ६८२८ क्युसेक असा एकूण ८२०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या वर्षी चांदोली धरण क्षेत्रात एकूण २८१२ मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणाची सांडवा पाणीपातळी ६२६.८५ मीटरपर्यंत पोहोचली आहे.