सृष्टिसौंदर्याचा मोह बनेल संकटांचा डोह!

By Admin | Updated: August 5, 2014 00:08 IST2014-08-04T23:01:35+5:302014-08-05T00:08:59+5:30

आनंद घ्या दुरून : धबधब्यात उतरणे, कड्यावर उभे राहणे, घाटात वाहने थांबविणे धोक्याचेच

The disaster of the universe will be destroyed! | सृष्टिसौंदर्याचा मोह बनेल संकटांचा डोह!

सृष्टिसौंदर्याचा मोह बनेल संकटांचा डोह!

परळी : डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा निसर्ग कितीही मनमोहक वाटत असला तरी निसर्गाचे स्वत:चे काही नियम असतात. ते नियम मोडणाऱ्यांना शिक्षा ही मिळतेच. सृष्टिसौंदर्याला भुलून कोणी मर्यादा ओलांडली तर अघटित घडणारच. ठोसेघर परिसरात सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी पर्यटकांचा लोंढा वाढू लागला आहे. डोंगरकपऱ्यांतून कोसळणारे धबधबे, भुरभुणारा पाऊस, हिरवेगार गालिचे, धुक्यांची दुलई, भिजलेल्या रानवाटा सारं काही भुरळ पाडणारं; पण ही रानभूल धोक्याची ठरू शकते.
निसर्गाचा आविष्कार अनुभवण्यासाठी राज्यभरातील पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात ठोसेघर परिसराला भेट देतात. सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी पर्यटकांचा लोंढा वाढू लागला आहे. यामध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. सुटीच्या निमित्ताने पर्यटन सहलींची आयोजन करून युवक-युवती, नवदाम्पत्य याठिकाणी येत आहेत. निसर्गाचा आनंद लुटत असताना अनेकदा समोरच्या धोक्याची कल्पनाही येत नाही. पावसामुळे पाऊलवाटा निसरड्या झालेल्या असतात. पाय घसरून अपघात घडू शकतो. दुरून सुंदर दिसणारा निर्झर जवळून पाहिलाच पाहिजे, असा अट्टाहास अंगाशी येऊ शकतो. शेवाळलेल्या खडकांवरून घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे भलते धाडस न केलेलेच बरे. (वार्ताहर)

पाण्याच्या प्रवाहात
उतरणे टाळा
डोंगरमाथ्यावरून वाहणारे ओव्हळ दरीतून वेगाने वाहत असतात. त्यामुळे खडकांची झिज होऊन त्यांना धार आलेली असते. त्या प्रवाहात उतरून फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. पण यामुळे दुखापत होऊ शकते. पाण्याच्या डोहात उतरणेही टाळले पाहिजे.
मद्य प्राशन हवे कशाला?
निसर्गसौंदर्यातच एवढी नशा आहे की ते पाहणारा तल्लीन होऊन जातो. यासाठी कुणाला मद्यप्राशन करण्याची गरजच काय? पण तरीही काही पर्यटक मद्य प्राशन करून रस्त्यात धिंगाणा घालत असतात. ज्याठिकाणी माणसाला आपला तोल सांभाळत चालावे लागते, तेथे मद्यपींची काय गत होईल, याचे भान ठेवायला हवे.
घाटातील मौज धोकादायक
घाटातील रस्ते अरुंद असतात. रस्त्यावर गाडी थांबविली तर मागून येणाऱ्या वाहनाला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. यातच घाटात धुके पसरल्यामुळे पुढचे काहीच दिसत नाही. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते.
रानवाटेवरून जरा जपून
पावसाळ्यात चिखलामुळे रानवाटा निसरड्या झालेल्या असतात. नागमोडी वाटांवरून भटकंती करताना घसरून आपटण्याची वेळ येऊ शकते.

Web Title: The disaster of the universe will be destroyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.