अपंग फिरस्त्याचा मृत्यू

By Admin | Updated: December 20, 2015 01:45 IST2015-12-20T01:03:42+5:302015-12-20T01:45:05+5:30

ताराबाई पार्कातील घटना : खून की दगडावर पडून मृत्यू ?

Disability Patience Death | अपंग फिरस्त्याचा मृत्यू

अपंग फिरस्त्याचा मृत्यू

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील एका भिंतीच्या कुंपणालगत अपंग फिरस्त्याचा शनिवारी सकाळी दगडावर संशयास्पद मृतदेह आढळून आला. इस्माईल अमीर शेख (वय ७५, रा. कनाननगर झोपडपट्टी ,कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. यामुळे ताराबाई पार्कात खून झाल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली; पण शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून शेख यांचा दगडावर पडून मृत्यू झाल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कनाननगर झोपडपट्टीतील इस्माईल शेख हे ताराबाई पार्क परिसरात फिरून एका हॉटेलजवळच्या कुंपणानजीक असलेल्या भिंतीलगत गेल्या कित्येक वर्षांपासून राहत होते. शनिवारी सकाळी शेख यांचा कुंपणालगत असलेल्या झाडाजवळ दगडावर डोक्याच्या डाव्या बाजूला रक्तस्राव झालेल्या अवस्थेतील मृतदेह नागरिकांना दिसला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला. तत्काळ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत चौधरी यांनी नागरिकांकडे विचारणा केली. त्यावर नागरिकांनी इस्माईल शेख हे कनाननगर झोपडपट्टी येथे राहावयास असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कनाननगर येथे जाऊन इस्माईल यांची मुलगी मंगल आप्पासो घाटगे यांना कळविले. मंगल घटनास्थळी आल्या. त्यांनी मृतदेह ओळखला. पोलिसांनी घाटगे यांची फिर्याद घेतली. यानंतर पंचनामा करून मृतदेह सीपीआर रुग्णालयात नेला.
जप्त केला मोठा दगड
इस्माईल शेख हे शुक्रवारी (दि. १८) रात्री लघुशंकेसाठी कुबड्या घेऊन उठले. झोपण्याच्या ठिकाणापासून १० ते १५ फूट असलेल्या झाडाजवळ त्यांनी लघुशंका केली. झाडाजवळ असलेल्या मोठ्या दगडावर शनिवारी सकाळी ते पडल्याचे दिसले, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर तपासासाठी हा दगड जप्त करून गाडीतून पोलिसांनी ‘सीपीआर’मध्ये आणला.
शेख मूळचे गोकाकचे
इस्माईल शेख हे मूळ गोकाकचे होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर ते कनाननगर येथे राहत होते. रोज ते कनाननगर येथे घरी जेवण करून पुन्हा या भिंतीजवळ येऊन राहत असल्याचे कनाननगरमधील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Disability Patience Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.