घाणीचे साम्राज्य,रस्त्यावर अतिक्रमण

By Admin | Updated: January 2, 2015 00:19 IST2015-01-01T23:32:10+5:302015-01-02T00:19:55+5:30

सार्वजनिक शौचालयांची वानवा : कत्तलखान्यामुळे सातत्याने चर्चेत, सांस्कृतिक सभागृहांचा अभावे

Dirt empire, encroachment on the road | घाणीचे साम्राज्य,रस्त्यावर अतिक्रमण

घाणीचे साम्राज्य,रस्त्यावर अतिक्रमण

एका बाजूला झगमगीत कॉलनी अन् दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी, सार्वजनिक शौचालयांची वानवा, जिकडेतिकडे घाणीचे साम्राज्य, रस्त्यांवरची अतिक्रमणे अशा गर्तेत सदर बझार प्रभाग अडकला आहे. सदर बझार हौसिंग सोसायटी, निंबाळकर माळ, संजय गांधी हौसिंग सोसायटी, धरतीमाता हौसिंग सोसायटी, दादासाहेब गायकवाड हौसिंग सोसायटी, गौतम राजगृह हौसिंग सोसायटी आणि पत्रकारनगर असा व्यापक विस्तार असलेला हा प्रभाग येथील कत्तलखान्यामुळे सातत्याने चर्चेत असतो.
सदर बझार चौक ते कोरगावकर हायस्कूल या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शाळांसमोरच कचराकुंड्यांतून ओसंडून वाहणारा कचरा, त्यातील दुर्गंधी हे दृश्य किळसवाणे आहे. या घाणीमुळे अस्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. सदर बझाराचे प्रवेशद्वार असलेल्या निंबाळकर माळ ते कोरगावकर हायस्कूल या परिसरातील शौचालयांची दुरवस्था आहे. यांतील काही शौचालये मोडकळीस आली असून, त्यांची डागडुजी होत नसल्याची तक्रार १९२, ई वॉर्ड आणि निंबाळकरनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सदर बझार हौसिंग सोसायटीमध्ये रिकाम्या जागेत नागरिकांनी झोपडपट्ट्या उभारलेल्या आहेत. जागेच्या अभावामुळे वैयक्तिक शौचालयाची उभारणी येथे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांशिवाय पर्याय नाही; पण आहे ती शौचालये तरी स्वच्छ ठेवावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. रस्त्यावरची अतिक्रमणे, कचऱ्याचे ढीग, गटारींची सफाई या समस्या प्रामुख्याने जाणवतात.
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी समाजमंदिराची गरज आहे; पण सदर बझार हौसिंग सोसायटी आणि ई वॉर्ड परिसरात समाजमंदिर नसल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध नाही. प्रॉपर्टी कार्डचे आश्वासन प्रत्येक नगरसेवकांनी गेल्या २० वर्षांत दिली आहेत; पण अद्यापही प्रॉपर्टी कार्डचा विषय प्रलंबित आहे. ई वॉर्डातील सुमारे ७१ घरांच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय सोडविण्याचे आश्वासन दरवेळी नागरिकांना देण्यात आले; पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ही ७१ घरे महापालिकेच्या जागेत आहेत. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार आवश्यक आहे; पण असे होत नाही. हा गेल्या २० वर्षांचा अनुभव असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. झोपडपट्टी परिसराबरोबरच अनेक कॉलनींमध्ये सांस्कृतिक सभागृहांची वानवा आहे. काही सोसायटींनी आपली जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. या जागेमध्ये सांस्कृतिक हॉल बांधून देण्याची मागणी कॉलनीतील नागरिकांमधूून व्यक्त होत आहे.

उद्याचा प्रभाग : रूईकर कॉलनी
प्रतिबिंब प्रभागाचे

संदीप खवळे

Web Title: Dirt empire, encroachment on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.