चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमा
By Admin | Updated: November 28, 2015 00:31 IST2015-11-28T00:30:42+5:302015-11-28T00:31:21+5:30
मेघराज राजेभोसले : मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीची मागणी

चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमा
कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची कार्यकारिणीची मुदत येत्या १० डिसेंबरला संपत आहे. मुदत संपत आली असतानाही तीन वर्षांच्या खर्चाचा हिशोब या कार्यकारिणीने दिलेला नाही. त्यामुळे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेली ही कार्यकारिणी त्याचपूर्वी बरखास्त करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत समिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली.
गेल्या वर्षभरापासून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून महामंडळाची सध्याची भ्रष्टाचारी कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, चित्रपती व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर अशा अनेक महान कलाकारांनी चित्रपटसृष्टीची बिजे येथे रोवली, वाढविली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना केली. त्यासाठी सुधीर फडके, राम कदम, कमलाकर तोरणे, प्रभातकुमार, बाळासाहेब सरपोतदार, आदी चित्रकर्मिंनी महामंडळाचे कार्य समृद्ध करण्यासाठी परिश्रम घेतले, असे हे महामंडळ मुंबईला हलविण्याचा घाट ही मंडळी करीत आहेत, अशा सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या महामंडळामध्ये गेल्या पाच वर्षांत प्रचंड गैरव्यवहार, अनागोंदी, मनमानी कारभार सुरू आहे. याशिवाय लाखो रुपयांची उधळपट्टी झाली आहे. ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात झालेला आर्थिक घोटाळा ध्यानात येताच सर्वच काळ््या घटनांना वाचा फुटली. शासन दरबारी, आयकर, विक्रीकर, आदी कार्यालयात याबाबत अनेक तक्रारी केल्या गेल्या. तरी अद्यापही न्याय मिळालेला नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर महामंडळाचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या सनदशीर आंदोलनाचा लढा म्हणून येत्या मंगळवारी (दि. १ डिसेंबर) महामंडळाच्या देवल क्लब येथील कार्यालयासमोर दारातच एक दिवसाचे आत्मक्लेष - लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. प्रथम कोल्हापूर व काही दिवसांनी पुणे, मुंबई येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर असे आत्मक्लेष उपोषण केले जाणार आहे. या मार्गाने जर प्रश्न सुटला नाही, तर नव्या वर्षात १ जानेवारीला महामंडळासमोर आमरण उपोषण करू, असे राजेभोसले यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस कार्यवाह भालचंद्र कुलकर्णी, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर, छाया सांगावकर, हेमसुवर्णा मिरजकर, बबिता काकडे, आदी रंगकर्मी उपस्थित होते.