(चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद) : कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना रशियन, जर्मन भाषांचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:18+5:302021-01-16T04:27:18+5:30
इंग्रजीसह उत्कृष्ट संभाषण कौशल्य हे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाप्रमाणे लँग्वेज लॅबमध्ये शिकता येते. ही लॅब म्हणजे केवळ भाषा उच्चारण, वाणीशुद्धी ...

(चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद) : कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना रशियन, जर्मन भाषांचे धडे
इंग्रजीसह उत्कृष्ट संभाषण कौशल्य हे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाप्रमाणे लँग्वेज लॅबमध्ये शिकता येते. ही लॅब म्हणजे केवळ भाषा उच्चारण, वाणीशुद्धी असे नाही, तर येथे विद्यार्थ्यांना कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध गोष्टी करता येतात.
-डॉ. विलास कार्जिन्नी
संतोष मिठारी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (केआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोल्हापुरातील पहिली अद्यावत लँग्वेज लॅब (भाषा प्रयोगशाळा) साकारली आहे. ही लॅब सुरू करण्याबाबतची भूमिका, विद्यार्थ्यांसाठी होणारा उपयोग, भविष्यातील नियोजन, आदींबाबत केआयटीचे संचालक आणि लँग्वेज लॅबचे प्रमुख डॉ. विलास कार्जिन्नी यांच्याशी साधलेला हा थेटसंवाद.
प्रश्न : लँग्वेज लॅब सुरू करण्याची ‘केआयटी’ची भूमिका कोणती होती?
उत्तर : केआयटी महाविद्यालयाचा समावेश ग्रामीण भागामध्ये होतो. विशेषतः येथे प्रवेश घेणारे विद्यार्थी हे कोल्हापूरबरोबरच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातीलसुद्धा आहेत. बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह जम्मू- काश्मीर, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, आदी परिसरातून विविध स्तरातून विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना आपण कुठून येतो, या गोष्टीचा न्यूनगंड न राहता त्यांची भाषा आणि संवाद कौशल्य सुधारण्यासाठी विशेषतः इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी ही अत्याधुनिक लँग्वेज लॅब उभारली आहे.
प्रश्न : ही लॅब साकारण्यासाठी कोणत्या संस्थेची मदत झाली?
उत्तर : आवश्यक सुविधा आणि विद्यार्थी यांचा विचार करून केआयटीला या लॅबसाठी केंद्राची मान्यता मिळाली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटी) गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी केआयटीला १२ लाख रुपयांचा निधी या लॅबला मिळाला. परंतु त्यापूर्वी केआयटी व्यवस्थापनाने महाविद्यालयांमध्ये अद्यावत पायाभूत सुविधा केल्या आहेत. सध्या या लॅबमध्ये शंभर संगणक, सॉफ्टवेअर, कॅमेरा सेटअप, ऑडिओ, व्हिडीओ सुविधा उपलब्ध आहेत.
प्रश्न : विद्यार्थ्यांना काय करता येणार आहे?
उत्तर : या लॅबमध्ये ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे, विचार करणे या कौशल्यांचा सराव करता येणार आहे. विद्यार्थी त्यांचे बोलणे रेकॉर्ड करू शकतात. ते बोलणे प्रमाणित उच्चार शास्त्राप्रमाणे तुलना करू शकतात. व्याकरण, गटचर्चा, निबंध लेखन, आदींचा सराव करता येतो. विद्यार्थ्याची देहबोली कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून त्याबाबत विद्यार्थ्यांना सल्ला आणि सुधारणा सुचविण्यात येतील.
प्रश्न : पुढील टप्पा कोणता असणार आहे?
उत्तर : या लॅबच्या भविष्यातील पहिल्या टप्प्यामध्ये इंग्रजी भाषेबरोबरच रशियन, जर्मन, जापनीज अशा भाषांचे क्लासेस सुरू केले जाणार आहेत. ही लॅब फक्त इंग्रजीपुरती मर्यादित न राहता त्याव्दारे इतर परदेशी भाषा विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना जगभरातील कंपन्यांमध्ये जास्तीत-जास्त संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एनडीए, एसएसबी, आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाईल. त्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करून त्यांचा सराव या लॅबच्या माध्यमातून करून घेतला जाणार आहे.
चौकट
सातत्यपूर्ण मूल्यमापन
अत्याधुनिक सॉफ्टवेअर, उपलब्ध असणारे तज्ज्ञ, विद्यार्थ्यांचे होणारे अचूक सातत्यपूर्ण मूल्यमापन हे या लॅबची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नजर ठेवून त्याच्यामध्ये सुधारणा सांगणे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत योग्य मूल्यमापन करणे आणि वारंवार त्यावर मार्गदर्शन करून त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे काम केले जात असल्याचे डॉ. कार्जिन्नी यांनी सांगितले.
चौकट
विद्यार्थ्यांसाठी विविध सत्रे
या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी त्यांचे इंग्रजी संभाषण, आत्मविश्वास, संभाषण चातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. लॅबचे सहसमन्वयक डॉ. महेश शिंदे यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांसाठी विविध सत्रे सुरू असल्याचे डॉ. कार्जिन्नी यांनी सांगितले.
फोटो (१५०१२०२१-कोल-विलास कार्जिन्नी (केआयटी)