‘अकरावी’च्या दुसऱ्या फेरीतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:04+5:302020-12-22T04:23:04+5:30
कोल्हापूर : शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी सोमवारी प्रसिध्द झाली आणि त्यानुसार ...

‘अकरावी’च्या दुसऱ्या फेरीतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू
कोल्हापूर : शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी सोमवारी प्रसिध्द झाली आणि त्यानुसार प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे महाविद्यालयांचा परिसर विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलला. या फेरीत विज्ञान, वाणिज्य (इंग्रजी) शाखेच्या १३११ जागा वाढल्या. कला (मराठी आणि इंग्रजी), वाणिज्य (मराठी) शाखेच्या एकूण २५८२ जागा रिक्त राहणार आहेत.
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून दुसऱ्या फेरीची निवड यादी सोमवारी सकाळी दहा वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे संकेतस्थळ आणि महाविद्यालयांमध्ये प्रसिध्द करण्यात आली. या फेरीत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मिळालेली महाविद्यालयाची माहिती ‘एसएमएस’द्वारे समितीकडून कळविण्यात आली. यादी पाहण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय गाठले. या फेरीत एकूण ९०३ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांसह पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नसलेल्या विद्यार्थ्यांचाही या निवड यादीत समावेश होता. या फेरीतील प्रवेश क्षमता ९४७६ असून प्रवेश मागणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६८९४ इतकी आहे. हवे ते महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्याची मुदत उद्या, बुधवारपर्यंत आहे.
चौकट
विवेकानंद, राजाराम कॉलेजचा ‘कटऑफ’ वाढला
या दुसऱ्या फेरीमध्ये विवेकानंद कॉलेज, राजाराम कॉलेजचा विज्ञान विद्या शाखेतील प्रवेशाचा कटऑफ हा पहिल्या फेरीपेक्षा एक ते दीड टक्क्याने वाढला. अन्य महाविद्यालयांचा कटऑफ कमी होऊन दोन ते चार टक्क्यांनी घटला आहे. वाणिज्य इंग्रजी माध्यमात डीआरके कॉमर्स कॉलेजचा कटऑफ ६० पॉंईटने, तर अन्य महाविद्यालयांचा कटऑफ दीड ते दोन टक्क्याने कमी झाला आहे.
कला मराठी आणि इंग्रजीमध्येही अशीच स्थिती आहे. प्रवेशासाठी अधिक कल असणाऱ्या महाविद्यालयांचा कटऑफ वाढला आहे, तर कमी कल असलेल्या महाविद्यालयांचा कमी झाला आहे.
चौकट
‘प्रवेश निश्चित’ विद्यार्थ्यांनी वर्गात बसावे
दुसरी फेरी ही अंतिम फेरी आहे. त्याद्वारे ॲलॉट झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या महाविद्यालयातील वर्गात बसावे, असे आवाहन शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी केले.