डफळापुरातील दुहेरी खून शेतगड्याकडून
By Admin | Updated: January 22, 2015 00:11 IST2015-01-22T00:03:59+5:302015-01-22T00:11:14+5:30
चोवीस तासांत छडा : शारीरिक, मानसिक छळामुळे कृत्य; गुन्ह्याची कबुली

डफळापुरातील दुहेरी खून शेतगड्याकडून
सांगली : जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष, जत पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण व त्यांच्या पत्नी शैला चव्हाण (डफळापूर, ता. जत) यांचा खून त्यांच्या शेतगड्यानेच केल्याचे आज, बुधवारी उघड झाले. याप्रकरणी काल, मंगळवारपासून फरारी असलेला त्यांचा शेतगडी परशुराम रामचंद्र हिप्परगी (वय ४३, रा. बरेडहट्टी, चमकेरी गावाजवळ, ता. अथणी, जि. बेळगाव) यास आज गुंडाविरोधी पथकाने अटक केली. जादा काम लावणे, शिवीगाळ, मारहाण करणे या मानहानीला कंटाळून दोघांचा खून केल्याची कबुली हिप्परगी याने दिली आहे. खुनानंतर २४ तासांच्या आत संशयितास अटक केल्यामुळे खुनाचे गूढ उकलले असून, अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
डफळापूर येथे सुनील बाळासाहेब चव्हाण (५५) व त्यांची पत्नी शैला चव्हाण (५०) यांचा सोमवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी निर्घृण खून करण्यात आला होता. शेतातील बंगल्यात रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही मृतदेह आढळून आले होते. काल सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. या खुनानंतर चव्हाण यांचा शेतगडी परशुराम हिप्परगी बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता.
गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील व पोलीस पथकाने अथणी पोलिसांच्या सहकार्याने बरेडहट्टी गावामध्ये छापा टाकून परशुराम हिप्परगी यास आज पहाटेच अटक केली. यावेळी त्याने खुनावेळी वापरलेले व रक्तात माखलेले कपडे, पळवून नेलेली दुचाकी (एमएच १० एझेड ३०६१), बूट पोलिसांनी जप्त केले. दुपारी हिप्परगी याची जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी कसून चौकशी केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या नऊ महिन्यांपासून परशुराम हा सुनील चव्हाण यांच्याकडे घरगडी व शेतमजूर म्हणून काम करीत होता. त्यासाठी त्याने चव्हाण यांच्याकडून ५० हजार रुपये अॅडव्हान्स घेतले होते. काम सोडून गेल्यास स्वत:ची पाच एकर कोरडवाहू शेती चव्हाण यांच्या नावावर करून देऊ, असे प्रतिज्ञापत्र चव्हाण यांनी त्याच्याकडून लिहून घेतले होते. त्या भीतीपोटी तो चव्हाण यांच्याकडे चाकरी करीत होता. चव्हाण यांनी त्याला शेतमजूर म्हणून आणले होते. मात्र शेतातील कामानंतर त्याला कपडे, भांडी धुणे, फरशी पुसणे हे जादा काम करावे लागत होते. जादा काम, शिवीगाळ, मारहाण, मानहानी यामुळे तो वैतागला होता. चार दिवसांपूर्वी चव्हाण यांनी ‘कॉल का घेतला नाहीस’, असा जाब विचारून त्याचा मोबाईल फोडून टाकला होता. रविवारी रात्री शेतातील कामामध्ये चूक झाली म्हणून त्याच्या नाकावर चहाचा कप फेकून मारला होता. त्यांच्या छळाला व मानसिक त्रासाला वैतागून त्याने चव्हाण व त्यांच्या पत्नीचा झोपेत कोयत्याने वार करुन खून केला. खुनानंतर पळून जाण्यासाठी त्याने प्रथम बोलेरो गाडी नेण्याचा प्रयत्न केला. पण ती हौदाला धडकल्याने तेथेच सोडून त्याने चव्हाण यांच्या मुलाची दुचाकी घेऊन पलायन केले. जातेवेळी त्याने घरातील दागिने, मोबाईल, चव्हाण यांच्या मुलाचे बूट बरोबर नेले.
हिप्परगी यास अटक केल्यानंतर अधिक तपासासाठी त्याला जत पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. जत न्यायालयाने त्याला ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुहेरी खुनाचा घटनाक्रम
रविवारी रात्री चव्हाण घरी आले. ते पत्नीसमवेत बेडरूममध्ये झोपी गेले. रात्री साडेअकराच्या सुमारास हिप्परगी आपल्या खोलीतून बाहेर पडला. बंगल्याला बाहेरून लावलेले कुलूप काढले. त्याची किल्ली त्याच्याकडेच होती. घरात प्रवेश करताच पहिल्या खोलीतच शेतीची अवजारे होती. त्यातील कोयता, विळा, सायकलची चेन त्याने घेतली. चेन कमरेला लावली. हातात कोयता घेऊन त्याने चव्हाण यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूमचा दरवाजा फक्त पुढे करण्यात आला होता. बेडरूममध्ये सुनील कॉटवर, तर त्यांच्या पत्नी शैला जमिनीवर झोपल्या होत्या. पावलांचा आवाज न करता तो कॉटजवळ गेला आणि कोयत्याचा वार सुनील यांच्या मानेवर केला. त्यांचा आवाज आल्यानंतर त्यांच्या पत्नी जाग्या झाल्या. त्यांनी ‘परशा काय करतोस’ असा आरडाओरडा केल्यानंतर त्याने कोयत्याचा दुसरा घाव त्यांच्या गळ्यावर केला. दोघे तडफडू लागल्यानंतर त्याने दोघांवर अनेक वार केले. दोघांची तडफड थांबल्यानंतर त्याने कॉटवरून सुनील यांना खाली ओढले. सुरुवातीला दोघांचे मृतदेह बाहेर नेऊन टाकण्याचा विचार केला, मात्र नंतर त्याने तो विचार सोडून दिला. बेडरूमचा दरवाजा बंद करून त्याने तेथील दारूची बाटली घेतली. किचनमध्ये जाऊन दारू प्राशन केली. त्यानंतर जेवण करून तो बाहेर पडला. रक्ताने माखलेली हत्यारे त्याने बाहेरील हौदावर ठेवली. सुरुवातीला त्याने बोलेरो गाडी सुरू केली; मात्र हौदावर धडकल्यानंतर ती तेथेच सोडून रात्री अडीचच्या सुमारास त्याने दुचाकी घेऊन पलायन केले.
तासगाव येथे शिक्षण
हिप्परगीचे वडील व एक भाऊ तासगाव येथे मजुरी करतात. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण तासगाव येथेच झाले आहे. त्याने एनसीसीमध्ये बी प्रमाणपत्रही मिळवले आहे. दहावीनंतर त्याने एक वर्ष कागवाड (ता. अथणी) येथे भोमाज डॉक्टरांच्या शेतात पत्नीसह शेतमजुरी केली. त्यानंतर गावी जाऊन शेती केली. उदरनिर्वाह चालेना म्हणून तो गेल्या नऊ महिन्यांपासून चव्हाण यांच्याकडे कामास होता.
पोलीस पथकाला ५० हजारांचे बक्षीस
दुहेरी खुनाचा गुन्हा चोवीस तासात उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीसप्रमुख सावंत यांनी पोलीस पथकाला ५० हजारांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला. यामध्ये पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे, सागर लवटे, गुंडा खराडे, संतोष पुजारी आदी बारा पोलिसांचा समावेश आहे.
शेत जाईल या भीतीपोटी खून
चव्हाण यांनी ५० हजारांच्या अॅडव्हान्सपोटी हिप्परगीच्या गावातील पाच एकर कोरडवाहू जमिनीचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले होते. काम सोडल्यास ही जमीन ते बळकावतील, ही भीती हिप्परगीला होती. काम तर सोडायचे होते; मात्र काम सोडल्यास जमीन जाईल, या भीतीपोटी त्याने चव्हाण कुटुंबाला संपविण्याचा निर्णय घेतला.
रात्रभराच्या वेदनेने खुनाचा निश्चय
खुनाच्या आदल्या दिवशी चव्हाण यांनी हिप्परगीच्या नाकावर चहाचा कप फेकून मारला होता. नाकावर मोठी जखम झाल्याने तो वेदनेने रात्रभर विव्हळत होता. त्यामुळे रविवारी रात्री त्याने चव्हाण यांना संपवायचे किंवा स्वत: तरी आत्महत्या करायची, असा निर्णय घेतला. शेवटी त्याने चव्हाण पती-पत्नीचा सोमवारी मध्यरात्री खून करण्याचा निर्णय घेतला. सुनील चव्हाण घरी आल्यानंतर शैला दिवसभराच्या कामातील चुका त्यांच्या निदर्शनास आणून देत होत्या. मारहाण करण्यास प्रवृत्त करीत होत्या. त्यामुळे चव्हाण नेहमी मारहाण करीत. या रागातूनच आपण त्यांचाही खून केला, असे त्याने सांगितले.