दिनकर मोहिते यांना खडसावले
By Admin | Updated: June 4, 2016 00:58 IST2016-06-04T00:54:34+5:302016-06-04T00:58:25+5:30
वारणा चोरीप्रकरण : कसला तपास करताय? सत्य समोर आणा : पोलिस अधीक्षक

दिनकर मोहिते यांना खडसावले
कोल्हापूर : वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील साडेचार कोटी रुपये चोरीप्रकरणी अडीच महिन्यांमध्ये केलेल्या तपासात संशयित विनायक जाधव रेकॉर्डवर कसा आला नाही? पोलिसांच्या तपासाबाबत लोक शंका घेत आहेत. या प्रकरणामागचे सत्य पुढे आणा. कोणतीही गोष्ट लपविण्याचा प्रयत्न करू नका, अशा कडक शब्दांत शुक्रवारी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना सुनावले.
दरम्यान, चोरलेल्या पैशांतील ६९ लाख ५० हजार रुपयांच्या हिश्श्यावरून मैनुद्दीन मुल्ला व विनायक जाधव यांच्यात सायबर चौकात वादावादी होऊन धक्काबुक्की झाली. त्याची मोबाईल व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या रकमेचा व संशयित जाधव याचा उलगडा झाला. फरारी मैनुद्दीनचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संशयित विनायक महादेव जाधव (वय ३५, रा. भामटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या मित्राकडील वारणानगर येथील चोरीमधील सुमारे ६८ लाख रुपये घेऊन मैनुद्दीन ऊर्फ अबुबकर मोहद्दीन मुल्ला पसार झाल्याने खळबळ उडाली.
अडीच महिन्यांपूर्वी मिरजेतील बेथलहेमनगर येथून सांगली पोलिसांना संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्या मेहुणीच्या घरातून सुमारे तीन कोटी सात लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर कोडोली पोलिसांनी वारणानगर शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ खोलीतून आणखी एक कोटी २९ लाख रुपये हस्तगत केले होते. मैनुद्दीनने साथीदार रेहान अन्सारी याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तपास केला.
मैनुद्दीनकडे केलेल्या चौकशीमध्ये कोठेही ६९ लाख ५० हजार किंवा संशयित विनायक जाधव हा स्वत: चोरी करण्यास असतानाही रेकॉर्डवर आला नाही. जाधव याने चोरीचे पैसेही स्वत:च्या तवेरा गाडीतून नेले होते, ती गाडीही पोलिसांच्या तपासामध्ये कोठे आली नाही.
पोलिसांच्या तपासातील विसंगती पुढे आल्याने त्यांनीही रकमेवर डल्ला मारल्याची चर्चा जिल्ह्यात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी पोलिस अधीक्षक देशपांडे यांना विचारला.
अन्सारीचा संबंध नाही!
पोलिसांनी मैनुद्दीनचा साथीदार रेहान अन्सारी हा फरार असल्याचे दाखविले आहे. त्याच्या तपासासाठी बिहारला पथकही पाठविले नाही. आता मात्र हेच पोलिस या गुन्ह्यामध्ये ‘अन्सारीचा संबंध असल्याचे दिसून येत नसल्या’चे सांगत आहेत!
वारणेच्या चोरीप्रकरणात विनायक जाधव हा स्वत: सहभागी होता. त्याच्याच गाडीतून पैसे नेण्यात आले, ही गोष्ट कुठेही तपासामध्ये पुढे आली नाही. तपास कसा करताय? लोक पोलिसांच्या तपासाबाबत शंका घेतील असा तपास करू नका, या प्रकरणातील सत्य पुढे आणा.
- प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक