दक्षिण महाराष्ट्राला अवकाळीचा दणका
By Admin | Updated: November 14, 2014 23:56 IST2014-11-14T23:41:35+5:302014-11-14T23:56:50+5:30
गुऱ्हाळघरे, द्राक्षबागा व स्ट्रॉबेरीच्या पिकावर दुष्परिणाम

दक्षिण महाराष्ट्राला अवकाळीचा दणका
कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा आज, शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे कोल्हापुरातील गुऱ्हाळघरांवर, कारखान्यांच्या हंगामावर परिणाम झाला आहे, तर सांगलीतील द्राक्षबागांवर दावण्या व करप्या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील अवकाळी पावसाच्या हजेरीचा मोठा फटका महाबळेश्वर, पाचणगीसह जावळी खोऱ्यातील स्ट्रॉबेरीच्या पिकांवर पडला आहे.मायणी भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचेही या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर गांगरले
कोल्हापुरात दिवसभर सूर्यदर्शन नाही. पहाटेपासून पावसाची वैताग आणणारी रिपरिप. हवेतला गारठा आणि सगळ्यांतला उत्साह हरवून टाकणारे वातावरण अशी आज, शुक्रवारी दिवसभराची कोल्हापुरातील स्थिती होती. लोकांना हिवाळ्यातील पावसाचा त्रासदायक अनुभव घ्यावा लागला. पाऊस धड मोठा नव्हता; परंतु तो थांबतही नव्हता, याचाच लोकांना जास्त वैताग आला होता. पावसाच्या रिपरिपीमुळे भाजी मंडई ओस पडली. व्यापारावर परिणाम झाला. सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. रब्बीच्या पिकांचे नुकसान करणारा हा पाऊस गूळ व साखर कारखानदारीच्याही अडचणीत भर घालणारा ठरला आहे.
सांगलीत द्राक्षबागांना फटका
सांगली : जिल्ह्यातील मिरज, तासगाव, खानापूर, पलूस या तालुक्यांतील काही भागात आज, शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. ढगाळ हवामान आणि पावसामुळे फुलोऱ्यातील द्राक्षबागांत फळकूज होण्याची शक्यता असून, दावण्या व करपा रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच परिसरातील द्राक्षबागायतदार औषधांची फवारणी करण्यात गुंतले होते. या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकांना मात्र जीवदान मिळाले आहे. या पावसाचा जोर येत्या ४८ तासांत कायम राहणार असल्याचे, तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
सिंधुदुर्गात संततधार; आंबा काजूला फटका
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, शुक्रवारी पावसाची संततधार सुरू होती. भातकापणी पूर्ण होण्यापूर्वी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्याचबरोबर या पावसाने साथरोगांच्या फैलावाचाही धोका वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे देवगडात मच्छिमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर ठेवणे पसंत केले. अवेळी आलेल्या या पावसाने काजूच्या झाडांना पालवी येईल. त्यामुळे फळधारणेची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. त्याचा फटका काजू पिकाला बसणार आहे. रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पाऊस
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या भातपिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांत दिवसभर संततधार सुरूच होती. त्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या आंबा मोहोरावर या बदलत्या वातावरणाचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)