दिलबहार-फुलेवाडी बरोबरीत

By Admin | Updated: January 20, 2017 00:04 IST2017-01-20T00:04:10+5:302017-01-20T00:04:10+5:30

केएसए लीग फुटबॉल सामना : मंगेश दिवसे, सचिन पाटील यांनी चढाया करीत नोंदविले गोल

Dillbahar-Phulewadi is tied | दिलबहार-फुलेवाडी बरोबरीत

दिलबहार-फुलेवाडी बरोबरीत

कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यात गुरुवारी दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला. आज, शुक्रवारी सामना संपताच लीग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, मधुरिमाराजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये सामना झाला. दोन्ही संघांनी प्रारंभापासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. ‘दिलबहार’ तालीम मंडळाकडून करण चव्हाण-बंदरे, सनी सणगर, जावेद जमादार, साहिल निंबाळकर यांनी; तर ‘फुलेवाडी’ संघाकडून किरण कावणेकर, मंगेश दिवसे, रोहित मंडलिक, अजित पोवार, तेजस जाधव यांनी खाते उघडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यामध्ये फुलेवाडी क्रीडा मंडळाकडून ३८ व्या मिनिटाला किरण कावणेकरच्या पासवर मंगेश दिवसेने गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. ही आघाडी कमी करण्यासाठी दिलबहार संघाकडून करण चव्हाण, रणवीर जाधव यांनी खोलवर चढाया केल्या. मात्र, समन्वयाअभावी त्या फोल ठरल्या. मध्यंतरापर्यंत फुलेवाडी संघ १-० अशा गोलफरकाने आघाडीवर होता.
उत्तरार्धात ही आघाडी कमी करण्यासाठी दिलबहार संघाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दिलबहार संघाने मिळालेल्या पेनॉल्टी किकवर सचिन पाटीलने गोल करीत सामना १ -१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. या गोलनंतर मात्र फुलेवाडी संघाने पुन्हा एकदा आक्रमक खेळी केली. यामध्ये अजित पोवार, सिद्धेश यादव, मंगेश दिवसे यांच्या सोप्या संधी हुकल्या. पाठोपाठ दिलबहार संघाकडून झालेल्या खोलवर चढाईमध्ये सचिन पाटील, जावेद जमादार, करण चव्हाण बंदरे, राहुल कावणेकर यांच्याही सोप्या संधी हुकल्याने सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला. दरम्यान, सामन्यातील गैरवर्तनाबाबत दिलबहार संघाच्या अनिकेत जाधवला दोन यलो कार्डमुळे पंचांनी थेट रेड कार्ड दाखविले. (प्रतिनिधी)


‘दिलबहार’ला पेनल्टीचा फायदा
दिलबहार संघाचा खेळाडू करण चव्हाण-बंदरेला फुलेवाडी संघातील खेळाडूंनी ‘डी’मध्ये धोकादायकरीत्या अडविल्याबद्दल दिलबहार संघास पेनल्टी बहाल करण्यात आली. त्या संधीचे त्यांनी गोलमध्ये रूपांतर करीत बरोबरी साधली.

ाजचा सामना : पीटीएम ‘अ’ वि. बालगोपाल तालीम मंडळ, दु. ४ वा.

Web Title: Dillbahar-Phulewadi is tied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.