दिलबहार ‘अ’ची विजयी सलामी
By Admin | Updated: November 24, 2014 00:12 IST2014-11-24T00:02:24+5:302014-11-24T00:12:45+5:30
के.एस.ए. लीग फुटबॉल : संध्यामठ-प्रॅक्टिस ‘ब’ यांच्यात २-२ बरोबरी

दिलबहार ‘अ’ची विजयी सलामी
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित के.एस.ए लीग ‘ए’ डिव्हीजन फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने प्रॅक्टिस क्लब ‘अ’वर २-० अशी मात केली, तर संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस ‘ब’ यांचा सामना २-२ असा बरोबरीत राहिला.
शाहू स्टेडियम येथे दुपारी चार वाजता दिलबहार ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब ‘अ’ यांच्यात झालेल्या सामन्यात पूर्वार्धाच्या १६ व्या मिनिटाला ‘दिलबहार’च्या जावेद जमादारने कॉर्नर किकद्वारे दिलेल्या पासवर नीलेश जाधव याने हेडद्वारे गोलची नोंद करत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ४७ व्या मिनिटाला ‘दिलबहार’च्या सनी सनगरने मोठ्या ‘डी’बाहेरून चार खेळाडूंना चकवत गोलची नोंद केली. त्यामुळे २-० अशी भक्कम आघाडी झाली. ‘दिलबहार’कडून प्रतीक व्हनाळीकर, करण चव्हाण, साईराम जाधव, गोलरक्षक दीपक कांबळे यांनी चांगली कामगिरी केली. सामन्याच्या पूर्णवेळेत ‘प्रॅक्टिस’ला बरोबरी करता न आल्याने अखेर सामना दिलबहार‘अ’ ने २-० असा जिंकला
दुपारी दोन वाजता पहिला सामना प्रॅक्टिस क्लब ‘ब’ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून अक्षय पाटीलने पहिला गोल नोंदविला. २० व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून ओंकार सूर्यवंशी याने गोल नोंदवत २-० अशी आघाडी घेतली. मात्र, पुढील मिनिटातच २१ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘ब’च्या स्वप्निल करपेने गोल करत
आघाडी २-१ अशी कमी केली.
‘संध्यामठ’च्या ओंकार सूर्यवंशीच्या गोल करण्याच्या अनेक संधी गेल्या. ६२ व्या मिनिटाला प्रॅक्टिसकडून प्रथमेश यादवने आलेल्या संधीवर गोलची नोंद करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. शेवटच्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघांकडून गोल नोंदविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले
नाही.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे पेट्रन -इन-चीफ श्री शाहू छत्रपती महाराज यांनी फुटबॉलला किक मारून केले. यावेळी महाराजकुमार मालोजीराजे, के. एस. ए.चे अध्यक्ष डी.के.अतितकर, उपाध्यक्ष दीपक शेळके, सीनिअर संघांचे अध्यक्ष माणिक मंडलिक, श्रीनिवास साळोखे, अजित खराडे, रावसाहेब सरनाईक, विनायक फाळके, शशिकांत नलवडे, सुमित पाटील, अरुण दळवी उपस्थित होते.
के.एस.ए. फुटबॉल लीग स्पर्धेचे उद्घाटन श्री शाहू छत्रपती महाराज यांनी फुटबॉलला किक मारून केले. सोबत मालोजीराजे, डी. के. अतितकर, दीपक शेळके, सीनिअर संघांचे अध्यक्ष माणिक मंडलिक, श्रीनिवास साळोखे, अजित खराडे, रावसाहेब सरनाईक, विनायक फाळके, आदी .
आजचे सामने
दुपारी २ वाजता : पाटाकडील ‘ ब’ विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस्
दुपारी ४ वाजता : खंडोबा विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस्