राज्य शासनाच्या चुकांमुळे मराठा आरक्षणाला अडचणी
By Admin | Updated: September 27, 2015 00:45 IST2015-09-27T00:42:59+5:302015-09-27T00:45:14+5:30
सुरेश पाटील : आरक्षणप्रश्नी पुन्हा रस्त्यावर उतरणार

राज्य शासनाच्या चुकांमुळे मराठा आरक्षणाला अडचणी
सांगली : अशासकीय समिती नियुक्त करतानाच आयोगाच्या शिफारसींचा विचार न करता मराठा आरक्षणाचा अहवाल तयार केल्यामुळेच न्यायालयीन लढाईमध्ये अपयश आले, असे मत मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, आरक्षणप्रश्नी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आघाडी सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली. राणे समितीच्या अहवालासाठी आयोगाच्या शिफारसींची गरज होती. तांत्रिक चुकांमुळेच न्यायालयीन लढाईमध्ये अपयश आले. कॉँग्रेस आघाडी सरकारने निवडणुका डोळ््यासमोर ठेवून घाईगडबडीत आरक्षण दिले होते. त्यामुळे आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते यात यशस्वी झाले. न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. त्रुटींबाबत ठोस बाजू सरकारला मांडता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने शासनाची आव्हान याचिकाही फेटाळली.
आता पुन्हा न्यायालयीन लढाईत सक्षमपणे हा प्रश्न मांडण्यासाठी वकिलांचे एक पॅनेल आम्ही तयार केले आहे. त्यामाध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान सरकारने नेमलेल्या वकील पॅनेलमधील अॅड. रवींद्र आडसुरे यांच्या हटवादी भूमिकेचाही फटका आरक्षणाच्या प्रश्नाला बसत आहे. त्यामुळे आम्ही वकील बदलण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय राजस्थान सरकारने गुज्जरांसह विशेष मागास वर्गासाठी पाच टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी १४ टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर केले आहे. राजस्थान सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा तोडण्याचे धाडस दाखवावे लागेल.
दाखले काढलेल्या मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या अखत्यारित मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत द्यावी किंवा शिष्यवृत्ती जाहीर करावी. अन्य मागासवर्गीय महामंडळांना मोठ्या निधीची तजवीज केली जात असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तुटपुंजा निधी देण्यात येत आहे. त्यास निधी वाढवून द्यावा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ््याची उभारणी करावी, खुल्या प्रवर्गातील जागा भराव्यात, आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे, भरत पाटील, प्रताप पाटील, रमेश पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)