प्रत्येक मतदारसंघात वेगळी आघाडी
By Admin | Updated: January 21, 2017 00:06 IST2017-01-21T00:06:14+5:302017-01-21T00:06:14+5:30
जिल्हा परिषदेचे रणांगण : पक्षीय निष्ठा, विचारधारा फाट्यावर

प्रत्येक मतदारसंघात वेगळी आघाडी
विश्वास पाटील -- कोल्हापूर --जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व जागा लढविण्याची ताकद एकाही राजकीय पक्षात नाही. त्यामुळे सोयीनुसार युती व स्थानिक आघाड्यांचे पेव फुटणार आहेच परंतु या निवडणुकीत तालुक्यापुरत्या सोडाच प्रत्येक मतदारसंघापुरती एक आघाडी होईल असे चित्र दिसत आहे. त्यामुळे पक्षीय निष्ठा, विचारधारा अशा गोष्टींना फाट्यावर मारले जाणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत काँग्रेसच्या विचारधारेला जनतेने कायमच पाठबळ दिले. हा जिल्हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला असला तरी जिल्हा परिषद मात्र कायमच काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. मावळत्या सभागृहातही काँग्रेसचे चिन्हांवर ३० सदस्य निवडून आले होते; परंतु आता राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे हे या पक्षाचे प्रमुख नेते; परंतु त्यांच्यात परस्परांत कमालीच्या अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळे हा पक्ष एकसंधपणे निवडणुकीस सामोरे जाण्यातच अडचण आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपला या निवडणुकीत बऱ्याच अपेक्षा आहेत; परंतु त्यांची ग्रामीण भागात फारशी ताकद नाही. तीच स्थिती शिवसेनेची आहे. शिवसेनेचे सहा आमदार असले तरी जिल्हा परिषदेतही या पक्षाचे सहाच सदस्य आहेत. आक्रमक पक्ष म्हणून आतापर्यंत राष्ट्रवादीची प्रतिमा होती परंतु तिथेही नेत्यांमध्ये अंतर्गत प्रचंड धुसफूस आहे. ‘मुश्रीफ यांचा एकखांबी तंबू’ असेच या पक्षाला स्वरूप आले आहे. जनसुराज्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काही तालुक्यांपुरतीच मर्यादित ताकद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व ६७ जागा व पंचायत समितीच्या १३४ जागा चिन्हांवर लढवू शकतील, अशी एकाही पक्षाची हिंमत नाही. आता जे आकडे पक्षांकडून जाहीर केले जात आहेत, तेवढ्या जागा लढविण्यासाठीही पक्षांकडे उमेदवार नाहीत. ‘कोण उमेदवार मिळेल का उमेदवार’ असे म्हणण्याची वेळ अनेक मतदारसंघांत आहे. त्यावर तोडगा म्हणून मग स्थानिक आघाड्यांचे पेव फुटले आहे.
आतापर्यंत चित्र असे होते की काही तालुक्यांपुरत्याच अशा आघाड्या केल्या जात होत्या; परंतु आता प्रत्येक मतदारसंघांत उघड किंवा छुपी आघाडी आकार घेऊ लागली आहे. पंचायत समितीला एका पक्षाबरोबर तर जिल्हा परिषदेला दुसऱ्याच पक्षाशी संधान बांधले जात आहे. काँग्रेसने त्यांचा राजकीय विरोधक असलेल्या भाजपशी कशी युती करायची, असा प्रश्नही कुणाला पडणार नाही कारण काही मतदारसंघांत पंचायत समितीचा उमेदवार व जिल्हा परिषदेचा उमेदवारांत असे साटेलोटे होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर करवीर दक्षिण, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांत भाजपशी थेटच आघाडी करणार आहे. ‘शिवसेना म्हणजे जातीयवादी पक्ष’ म्हणणारे दोन्ही काँग्रेसवाले भाजपचा काटा काढण्यासाठी शिवसेनेची मदत घेणार आहेतच शिवाय पुन्हा सत्ता आणण्यासाठी जागा कमी पडल्या तर त्यांना सोबतीला घेतले जाणार आहे. महापालिकेच्या सत्तेत जसे सेनेला भाजपपासून अलगद बाजूला केले गेले तशी खेळी येथेही होणार आहे.
सर्वच पक्षांची ही स्थिती असल्याने सत्ता कुणाची येणार याबद्दलही कमालीचा संभ्रम आहे. काँग्रेसने पाच वर्षांत सत्ता असूनही काही दिवे लावले नसले तरी त्यांना बाजूला करून कुणाकडे या ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या संस्थेच्या चाव्या द्यायच्या, याचेही उत्तर मतदारांकडे नाही.
‘भाजता’पुढेही अडचणीच अधिक
भाजप-जनसुराज्यसह ताराराणी आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मोट बांधणार आहे. हे सगळे गणित जमविण्याची जबाबदारी अर्थातच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतली आहे. त्यांचा स्वभाव आता जो प्रॉब्लेम आहे, त्याचे उत्तर शोधायचे. ‘पुढचे पुढे बघू,’असा आहे. प्रश्न सुटणार असेल आणि कुणाला चंद्र आणून देतो म्हणून सांगायचे असेल तर त्यातही ते मागे राहत नाहीत; परंतु ही सगळी मोटच आंतरिक विरोधाने ग्रासलेली आहे. कारण कोरे व शेट्टी यांचे जमत नाही. आता त्यात भाजप व शेट्टी यांचेही जमेना झाले आहे. त्यामुळेच शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचे हाकारे द्यायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला कोरे व महाडिक यांचाही छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे या एका म्यानात तीन धारदार तलवारी बाळगताना पालकमंत्री दादांचीच कसरत होणार आहे.