महापौरांवर बहिष्कारावरून दुफळी

By Admin | Updated: February 26, 2015 00:09 IST2015-02-25T23:50:55+5:302015-02-26T00:09:12+5:30

महापालिका विशेष सभा : काँग्रेसच्या दोघांसह शिवसेना-भाजपचे ११ नगरसेवक उपस्थित; सभा तहकूब, समांतर शोकसभा

Differences on boycott of mayor | महापौरांवर बहिष्कारावरून दुफळी

महापौरांवर बहिष्कारावरून दुफळी

कोल्हापूर : नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण-२०११ वर चर्चा करण्यासाठी महापालिकेत बोलाविलेल्या बुधवारच्या विशेष सभेवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठरल्याप्रमाणे बहिष्कार टाकला. मात्र, सभेला अनुपस्थित राहण्याचे आवाहन करूनही शिवसेना-भाजप, अपक्ष व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांसह ११ सदस्यांनी सभेला उपस्थिती दर्शवत प्रस्थापितांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तहकूब सभेचे शोकसभेत रूपांतर करून महापौरांनी ‘कारभाऱ्यां’नाच शह देण्याचा प्रयत्न केला. दिवसभर ‘शह-प्रतिशह’च्या राजकारणात महापालिका ढवळून निघाली. कोरमअभावी तहकूब सभा पुन्हा शुक्रवारी (दि.२७) घेण्याचे ठरले.तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांविरोधात ‘असहकार’ पुकारला आहे. त्यामुळे त्यांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौरांना निमंत्रित न करता उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी शोकसभा घेण्यात आली. शोकसभेनंतर पक्षीय बैठक घेत नगरसेवकांनी सभेला जाऊच नये, अशी व्यूहरचना आखली. तरीही ११ सदस्य सभेला उपस्थित राहिलेच. त्यानंतर चिडलेल्या सत्ताधाऱ्यांनी सेना-भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप करत निषेध व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध डावलत या ‘विशेष सभे’ला काँग्रेसचे सतीश घोरपडे, किरण शिराळे हे दोघे, तर आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, संभाजी जाधव, स्मिता माळी, प्रभा टिपुगडे, पल्लवी देसाई, अरुण टिपुगडे, राजू हुंबे, महेश कदम या शिवसेना-भाजप व अपक्ष अशा ११ नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविली. सभेसाठी आवश्यक २८ नगरसेवकांची उपस्थिती नसल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले.
त्यानंतर सभागृहातच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्याची मागणी आर. डी. पाटील यांनी केली. आयुक्त पी. शिवशंकर सभेचे कामकाज संपल्याने सभागृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर याच सभागृहात महापौर व उपस्थित नगरसेवकांनी गोविंद पानसरे व आर. आर. पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)

पक्षातून हकालपट्टी झाली तरी राजीनामा नाही : महापौर

१‘राष्ट्रवादी’तर्फे राजीनाम्यासाठी २८ फे ब्रुवारीची डेडलाईन दिली आहे, हे खरे असले तरी राजीनामा देणार नाही. मात्र, या कारणास्तव पक्षातून काढले जाईल, असे वाटत नाही. वरिष्ठ स्तरावरही माझ्यावरील पक्षीय कारवाई करणाऱ्यांना विचारणारे आहेत. त्यामुळे पक्षीय कारवाईचे भय नाही, अशा शब्दांत महापौर तृप्ती माळवी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर पलटवार केला.

२ राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. पुढील महिन्यात आर्थिक नियोजनासाठी (बजेट मिटिंग) महासभा बोलाविणार आहे. पक्षीय राजकारणाचा भाग बाजूला ठेवून ज्यांना शहराच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज वाटते, ते नगरसेवक सभेला उपस्थित राहतील. कोरमअभावी पुढील सभा तहकूब होणार नाही, असे वक्तव्य महापौरांनी यावेळी केले. डेडलाईन संपल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यातच सत्ताधारी नगरसेवकांनी बुधवारच्या सभेवर बहिष्कार टाकत कोरमअभावी सभाच होऊ दिली नाही. या पार्श्वमूवीर महापौरांनी राजीनामा न देण्यावर ठाम असल्याचे सांगत नगरसेवकांनीच शहर हितासाठी सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

३राजीनामा न देण्यामागे किंवा द्यावा, यासाठी कोणतेही राजकीय किंवा वैयक्तिक दबाव नाही. राजीनाम्याबाबतचा निर्णय सर्वस्वी स्वत:चा आहे. राजीनामा कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. उलट जोमाने काम करणार आहे. लवकरच आढावा बैठक घेऊन प्रशासकीय अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. शहराच्या हितासाठी नगरसेवकांना सभागृहाचे कामकाज चालू देणे गरजेचे आहे, असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेना-भाजप दुटप्पी : कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप
कोल्हापूर : सेना-भाजपच्या नगरसेवकांची महापौर तृप्ती माळवी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या विशेष सभेतील उपस्थिती कॉँग्रेस-राष्ट्रवादीला जिव्हारी लागली. महापौरांच्या विरोधात महापालिकेच्या दारात आंदोलन करायचे अन् दुसऱ्या बाजूला त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभागृहात उपस्थिती दर्शवायची, ही शिवसेना-भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप करीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सेना-भाजपच्या विरोधात स्थायी सभागृहात बुधवारी जोरदार घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला. गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन लाचखोर प्रवृत्तीची मोकाटगिरी रोखण्यासाठी सभागृहाच्या पटलावरील विषयांचे गांभीर्य पाहून यापुढील सभेवरील बहिष्काराबाबत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले.
‘शिवसेना-भाजपचा निषेध असो,’ ‘धिक्कार असो, धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा देत सत्ताधारी नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गटनेता राजेश लाटकर व शारंगधर देशमुख यांनी पक्षीय भूमिका स्पष्ट केली. कोणासही सभेला न जाण्यास बळजबरी केलेली नाही. सर्व नगरसेवकांची एकजूट आहे, असे सांगत हातात हात घालून एकजुटीची साक्ष यावेळी दिली.
गोविंद पानसरे यांंच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा बोलाविली होती. यास उपस्थित न राहता सेना-भाजपने स्वतंत्र सभा घेण्याची गरज नव्हती. लाचखोरीच्या संशयात अडकल्याने शहरभर महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करीत आंदोलन करायचे आणि त्याच महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात उपस्थित राहायचे, हा दुटप्पीपणा आहे. यामागील षड्यंत्र समजण्याइतपत आम्ही दूधखुळे नाही. भविष्यातील सभागृहात येणारे विषय व त्यांचे महत्त्व पाहून दोन्ही कॉँग्रेस महापौरांना विरोध करतील. कॉँग्रेसचे दोन सदस्य किरण शिराळे व सतीश घोरपडे यांच्या उपस्थितीबाबत पक्षातर्फे जाब विचारला जाईल, असे लाटकर आणि देशमुख यांनी स्पष्ट केले.


कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात येणार नाहीत, म्हणून वाटेल त्या पद्धतीने ठराव करून घेता येईल, यासाठीची ही सेना-भाजपची व्यूहरचना आहे. मात्र, या प्रवृत्तीविरोधात त्या-त्या वेळीप्रमाणे सर्वानुमते धोरण ठरवू. लाचखोर प्रवृत्तीची ही मोकाटगिरी चालू देणार नाही, अशा शब्दांत गटनेत्यांनी पुढील काळात महापौरांना वेगळ्या पद्धतीने प्रखर विरोध करण्याचे संकेत दिले.

गोविंद पानसरे यांचे स्मारक उभारणार
सर्वपक्षीय शोकसभेत निर्णय : शाळा, वाचनालयही सुरू करणार
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महापालिका त्यांचे उचित स्मारक उभारील. महापालिकेच्या शाळेत त्यांची पुस्तके वाटून एका शाळेस त्यांचे नाव देऊ, तसेच वाचनालय सुरू करून पानसरे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल, असे प्रतिपादन उपमहापौर मोहन गोंजारे यांनी महापालिकेत बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेत केले. सर्वपक्षीय नेत्यांनी पानसरे यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या शोकसभेत राज्य व केंद्र शासनाने या पुरोगामी नेत्याला आदरांजली वाहण्याची तसदीही घेतली नाही, याची खंत व्यक्त करून शासनाचा सर्वच नेत्यांनी निषेध केला. पानसरे यांचे अपूर्ण कार्य, विचारांचा लढा तितक्याच जोमाने पुढे नेण्यासाठी पुढील पिढीला त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शन राहावे, यासाठी पानसरे यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेता राजेश लाटकर यांनी सभेत केली. ही मागणी सर्वच कार्यकर्त्यांनी उचलून धरली.
पानसरे हे शहराची सदसद्विवेक बुद्धी होते. भावी पिढीला त्यांचे कार्य चिरंतन स्मरणात राहून दिशादर्शक ठरेल, अशा प्रकारे त्यांच्या विचारांना साजेसे स्मारक उभारण्याचा निर्णय सर्वानुमते सभेत घेण्यात आला. यावेळी कुमार जाधव, बाबा इंदुलकर, प्रसाद पाटील, नंदकुमार मराठे, मुरलीधर जाधव, आदींसह कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप, माकप, श्रमिक दल, शेकाप, ‘आप’, मनसे, आदींसह राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी भावना व्यक्त केल्या. (प्र्रतिनिधी)

Web Title: Differences on boycott of mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.