अभिनेत्री व्हायचं नव्हतं --तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला
By Admin | Updated: December 3, 2014 00:23 IST2014-12-03T00:12:40+5:302014-12-03T00:23:02+5:30
सुकन्या कुलकर्णी : प्रकट मुलाखत खुलली

अभिनेत्री व्हायचं नव्हतं --तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला
कोल्हापूर : अभिनेत्री व्हायचं नव्हतं, बँकेत नोकरी करायची किंवा शिक्षिकेची नोकरी एवढाच विचार लहानपणी डोक्यात होता. अनवधानाने नाटक क्षेत्रात आले... ‘दुर्गा गौरी’ हे पहिले नाटक.. पण ‘झुलवा’ या वामन केंद्रेंच्या देवदासींवरील नाटकामध्ये जगनीची भूमिका कलाटणी देऊन गेली आणि तिथून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास ‘जुळूनि येती रेशीमगाठी’मधील माईपर्यंत पोहोचला, अशा शब्दांत ‘आभाळमाया’ फेम आणि मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतील अभिनेत्या सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी अभिनय कारकिर्दीचा आलेख उलगडला. तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत चारूदत्त जोशी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
अभिनयाच्या कारकिर्दीबाबत सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, पाचवीपासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली. त्यावेळी भरतनाट्यममध्ये करिअर करण्याचा विचार होता. अभिनेत्री व्हायचा विचार कधी मनातही नव्हता. अनवधानाने या क्षेत्रात आले. ईश्वर हा पहिला चित्रपट केला. हा चित्रपट सुरू असतानाच वामन केंद्रेंच्या देवदासींवरील झुलवा या नाटकात जगनीची भूमिका केली. या भूमिकेने खूप नाव मिळाले.
मालिका आणि चित्रपट इंडस्ट्रीबद्दल कुलकर्णी म्हणाल्या, काम करताना नेहमीच प्रसिद्धी आणि पैसा यांचा अतिरेकी मोह टाळण्याचा प्रयत्न केला. स्वत:वर विश्वास असल्यामुळे या क्षेत्रातील अपयशाची फारशी चिंता केली नाही.
अपघातामुळे नृत्य बंद झाले. पॅरालिसिसमुळे बोलणेही बंद झाले होते; पण या घटनांतूनही सावरून अभिनयात दमदार पदार्पण केले.
आताच्या मालिकांमध्ये मूळ कथांमध्ये अनेक उपकथा घुसडल्या जातात, हे खेदजनक आहे. आभाळमाया मालिकेचे पन्नास भाग तयार झाल्यावरच आम्ही काम सुरू केले; पण आता याबाबतीत गडबड ्नहोत आहे. टीआरपीसाठी या गोष्टी होत आहेत. कलाकारांमधील परस्पर विश्वास हरवत आहे. पूर्वी दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार यांच्यात विश्वासाचे वातावरण होते. आता तशी परिस्थती राहिलेली नाही. मराठीमध्ये जो जिव्हाळा आहे, तो हिंदी चित्रपटसृष्टीत नाही. ‘सर्फरोश’मध्ये अमीर खानसोबत काम करण्याचा योग आला.