शेतकऱ्यांना अच्छे दिन आले का ?
By Admin | Updated: February 16, 2017 00:46 IST2017-02-16T00:46:20+5:302017-02-16T00:46:20+5:30
राजू शेट्टी यांची भाजपवर टीका : नवे पारगाव येथे स्वाभिमानीची प्रचार सभा

शेतकऱ्यांना अच्छे दिन आले का ?
नवे पारगाव : भाजपने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आणणार असल्याचे स्वप्न दाखविले, पण हे अच्छे दिन आले का? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांला आता संधी द्यावी, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घुणकी जि. प. मतदारसंघाच्या उमेदवार स्वाती कांबळे यांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी खासदार राजू शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी सदाशिव बोने पाटील होते.
स्वाभिमानीच्या घुणकी जि. प. मतदारसंघाच्या उमेदवार स्वाती कांबळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ किणी येथे हनुमान मंदिरात झाला. त्यानंतर घुणकी, चावरे, तळसंदे, पारगाव येथील ग्रामदैवताच्या ठिकाणी खासदार राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते मोटारसायकलवरून रॅलीने गेले. जुने पारगाव येथे या रॅलीची प्रचार सभेने सांगता झाली.
खा. शेट्टी म्हणाले, भाजपने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले, पण ते फोल ठरविले. शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेत संघटनेच्या कार्यकर्त्यांला पाठवावे आणि विकास साधावा, असेही आवाहन केले. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके, जिल्हा नियोजनचे सदस्य शिवाजी माने, वैभव कांबळे यांनी स्वाती कांबळेंना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश पाटील, हणमंत हवालदार, आण्णा मगदूम, शिवाजी शिंदे, सुधीर मगदूम, दीपक सनदे, सुनील पचिंबरे, हरिभाऊ जाधव, सूर्यकांत पाटील, किरण पाटील, दत्ता भांबुरे, मानसिंग मोहिते, विकास मोहिते उपस्थित होते. विभाग प्रमुख संपत पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी आंबेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)