चेतना, स्वयंम, जिज्ञासाची स्वावलंबनातून तेजोमय दिवाळी
By Admin | Updated: November 5, 2015 00:25 IST2015-11-05T00:24:20+5:302015-11-05T00:25:15+5:30
अपंगत्वावर मात : संस्थांमधील मुलांनी बनविले आकाशकंदील, पणत्या, पूजेचे साहित्य

चेतना, स्वयंम, जिज्ञासाची स्वावलंबनातून तेजोमय दिवाळी
कोल्हापूर : निसर्गाने आपल्याला दिलेल्या शारीरिक, बौद्धिक अपंगत्वावर मात करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारलेल्या चेतना, स्वयंम, जिज्ञासा या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, आकर्षक दिवे, दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य, भेटवस्तूंचे बॉक्स बनविले आहेत. त्यांच्या या धडपडीला आणि प्रयत्नांना साथ देण्यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे यायला हवेत.
मतिमंदत्व आणि अपंगत्व आलेल्या व्यक्तींना याावर मात करीत जगण्याची कला आणि स्वयंनिर्भरतेचे धडे देणाऱ्या चेतना, जिज्ञासा आणि स्वयंम या संस्थांनी नवी दिशा दिली आहे. या विद्यार्थ्यांच्या हाताला काम देताना त्यातील आपुलकी जपत संस्थेच्यावतीने दरवर्षी दिवाळीत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, दिवे बनविले जातात. दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी लागणारे साबण, उटणे, तेल या साहित्यांचा बॉक्स बनविला जातो. तसेच लक्ष्मी पूजन साहित्यांचीही विक्री केली जाते. या साहित्यांची किंमतही वाजवी असते. (प्रतिनिधी)
आम्ही संस्थेत दरवर्षी ४० हजार पणत्या, ५००० दिवाळी स्पेशल गिप्ट बॉक्स, तीन हजार किलोचे उटणे, लक्ष्मी पूजन साहित्याचे पुडे ३०००, एक हजार डझन आकाशकंदील बनवतो. अखेरच्या काही दिवसांत जास्त वेळ बसून काम पूर्ण करावे लागते. या पैशांतून विद्यार्थ्यांसह संस्थेचा खर्च भागविला जातो.
- कृष्णात चौगले (कार्यशाळा प्रमुख, चेतना संस्था )
आमच्या संस्थेत जून महिन्यापासूनच दिवाळीचे साहित्य बनवायला सुरुवात होते. आकाशकंदील, दिवाळी गिप्ट बॉक्स, पणत्या बनविल्या जातात. उटणे संस्थेतच बनविले जाते. विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेलाही वाव मिळतो.
- स्मिता दीक्षित
(संस्थापक, जिज्ञासा)