धुळे, सिंधुदुर्ग विजयी
By Admin | Updated: November 12, 2014 00:16 IST2014-11-11T23:54:10+5:302014-11-12T00:16:14+5:30
ंमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा

धुळे, सिंधुदुर्ग विजयी
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत आज, मंगळवारी झालेल्या उद्घाटनीय सामन्यात धुळे विभागाने मुंबई विभागावर तर सिंधुदुर्ग विभागाने लातूर विभागावर मात करत विजयी सलामी दिली. शिवाजी स्टेडियम व राजर्षी शाहू स्टेडियमवर झालेल्या सामन्याचे उद्घाटन रा. प. मुंबईचे मुख्य कामगार अधिकारी वि. ना. शेटे व कोल्हापूर विभाग नियंत्रक सुहास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
राजर्षी शाहू स्टेडियमवर मध्यवर्ती कार्यालय, मुंबई विभाग विरुद्ध धुळे विभाग यांच्यामध्ये झाला. मुंबई विभागाने प्रथम फलंदाजी करताना २१.४ षटकांत सर्वबाद ५४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये कर्णधार संदीप सरणकर यांनी १३ धावा केल्या. धुळे विभागातर्फे गोलंदाजी करताना मिलिंद पाटील व सुनील पाटील यांनी प्रत्येकी तीन बळी तर मोहन किलस्करने दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना धुळे विभागाने हे आवाहन ६.१ षटकांत आव्हान पूर्ण करत विजयी सलामी दिली. त्यामध्ये पद्माकर बाबरने नाबाद १७ धावा केल्या.
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सिंधुदुर्ग विभाग विरुद्ध लातूर विभाग यांच्यामध्ये सामना झाला. लातूर संघाने प्रथम फलंदाजी करताना २०.४ षटकांत ७७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये सचिन संपते याने २४ धावा केल्या. सिंधुदुर्ग विभागातर्फे गोलंदाजी करताना कैतान फर्नांडिसने ३ तर सुधीर भातमारे, तमास अलमेडाने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना सिंधुदुर्ग विभागाने हे आव्हान अवघ्या १३.४ षटकांत एक गडी गमावून पूर्ण केले. त्यामध्ये शेखर तेंडोलकरने नाबाद ३० धावा तर सागर चिकोडीकरने नाबाद १६ धावा केल्या.
उद्घाटनप्रसंगी यंत्रअभियंता एस. डी. कणेगावकर, विभागीय वाहतूक अधिकारी एस. टी. भुरे, उपयंत्र अभियंता बी. के. भातमारे, दीपक घारगे, सोपान गोसावी, मधू बामणे, किरण रावण, प्रभाकर यादव, धर्मशील गायकवाड, शमील शेख आदी उपस्थित होते.