समीर देशपांडे कोल्हापूर : धुळे जिल्ह्यातील विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा १ कोटी ८४ लाख रुपयांचे घबाड सापडल्याने चर्चेत आला आहे. याच पध्दतीने गेल्या काही वर्षांतील पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्याही अविस्मरणीय आठवणी यानिमित्ताने काढल्या जात आहेत. ‘पंचायत राज समितीचा थाट आणि आमच्या खिशाला चाट’ असे अधिकारी का म्हणतात, हे या समितीचा ज्या - ज्या ठिकाणी दौरा होऊन जातो त्यानंतरच्या चर्चेतून लक्षात येते. अनेक प्रकारची ऑडिट सुरू असताना चार वर्षांनंतर कारभाराची चौकशी करणारी ही समिती खरोखरच उपयुक्त ठरते का, याचाही फेरविचार होण्याची गरज आहे.महाराष्ट्र विधिमंडळांच्या आमदारांची ‘पंचायत राज समिती’ असून, तिचे लघुरूप म्हणजे ‘पीआरसी.’ ही समिती येणार म्हटले की, चार महिने आधी अधिकारी, कर्मचाऱ्यांची झोप उडते? ही समिती परत जाईपर्यंत अनेकांच्या जिवात जीव नसतो. अनेकांच्या खिशाला या सर्व प्रक्रियेमध्ये किती चाट लागली, याचाही पत्ता नसतो. या अंदाज समितीच्या प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याच्या आधीच्या दणक्याने विधिमंडळाच्या या समित्या चर्चेत आल्या आहेत.
२५ ते ३० आमदारांची ही समिती सरकार स्थापन झाले की, बनविण्यात येते. ही समिती चार वर्षांपूर्वीच्या कामाचा हिशेब मागण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा दौरा करते. या समितीला विधानमंडळाचे सर्व अधिकार प्राप्त असतात. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची वेगळी प्रश्नावली तयार केली जाते. याची उत्तरे शोधण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सुट्यांच्या दिवशीही काम करतात. चार - पाच वर्षांपूर्वीच्या फायली उपसल्या जातात आणि माहिती जमा केली जाते. स्थानिक निधीच्या लेखापरीक्षणातील मुद्दे काढून त्याचे स्पष्टीकरण विचारले जाते. त्यासाठी बदलून गेलेले अधिकारीही परत समितीसमोर येतात.
जागेवर निलंबनाचा अधिकारया समितीला एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला जागेवरच निलंबित करण्याचा अधिकार आहे. याचाच फायदा घेऊन एक भीतीयुक्त वातावरण तयार करण्यात येते. मग या समितीच्या खास पाहुणचारासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांना आणि गटविकास अधिकाऱ्यांना वेठीस धरले जाते. हे सर्वजण ठेकेदार आणि मोठ्या ग्रामपंचायतीला दम देतात. अशी वर्गणी गोळा करून ठेवली जाते आणि मग समिती परत जाण्याआधी हा पाहुणचार केला जातो.
गाड्या भरून साहित्यया समितीच्या काही सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या २०१८ साली दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांनी गोळा केलेल्या पैशातून इतके साहित्य खरेदी केले की, ते नेण्यासाठी जादाच्या दोन गाड्या येथून कराव्या लागल्या. कोल्हापुरी पायताण, गुळाच्या ढेपांसह बरेच साहित्य यामध्ये असल्याचे सांगण्यात येते.
पंचायत राज समिती दौऱ्यावर आल्यानंतर अनेक चर्चा जिल्हा परिषदेत ऐकू येतात. या समितीने खरोखरच पंचायत राज क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा करण्यासाठी योगदान देण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. आजही ग्रामपंचाायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचे कामकाज करताना अनेक अडचणी येतात. त्यावर उपाययोजना सुचविल्यास या समितीची उपयुक्तता आणखी वाढेल.- राजू मगदूम सरपंच, माणगाव, ता. हातकणंगले