कोरे-पाटील यांच्यातच धुमशान--शाहूवाडी एकूण मतदार २,६६,७७२

By Admin | Updated: October 9, 2014 00:19 IST2014-10-08T23:27:34+5:302014-10-09T00:19:16+5:30

मतविभागणीच ठरणार निर्णायक : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरात

Dhoreshana between Kore-Patil - Total voters in Shahuwadi, 2,66,772 | कोरे-पाटील यांच्यातच धुमशान--शाहूवाडी एकूण मतदार २,६६,७७२

कोरे-पाटील यांच्यातच धुमशान--शाहूवाडी एकूण मतदार २,६६,७७२

राजाराम कांबळे - मलकापूर -शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य, शिवसेना, कॉँग्रेसचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, तर मतविभागणीचा फायदा व तोट्याची गणिते मांडण्यात नेत्यांसह कार्यकर्ते गुंग आहेत. गत निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातून विनय कोरे हे एकमेव उमेदवार होते. पन्हाळ्यातील एकगठ्ठा मतांमुळे ते विजयी झाले होते. यावेळी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अमर पाटील यांनी प्रचार यंत्रणा जोरात राबवून खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत, माजी आमदार यशवंत पाटील यांना प्रचारात उतरले आहे. शाहूवाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड रिंगणात आहेत. विनय कोरे यांनी वारणा साखर कारखाना, दूध संघाचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची फौज प्रचारात उतरविली आहे. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनीदेखील प्रचारात आघाडी घेतली आहे. शाहूवाडी तालुक्यातून सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे. शाहूवाडी तालुक्यातून जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे घेतले आहेत. माजी आमदार बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’च्या संचालिका अनुराधा पाटील या देखील प्रचारात सामील झाल्या आहेत. एकंदरीत शाहूवाडीचा आमदार करायचा या उद्देशाने सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेनेचे उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर, तालुका उपजिल्हाप्रमुख दत्ता पोवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंबीरराव पाटील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. कॉँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांनी वाड्या-वस्त्या, धनगरवाडे पिंजून काढले आहेत. सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून आपण निवडणुकीस का उभे आहोत हे पटवून देत आहेत. त्यांच्यासोबत महिला बालकल्याण माजी सभापती भाग्यश्री गायकवाड, जिल्हा परिषदेचे सदस्य योगिराज गायकवाड, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड प्रचारात उतरल्या आहेत. मनसेच्या संजय पाटील यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे मानसिंगराव यांनी उघड भूमिका घेतली नसली, तरी त्यांचे पुत्र रणवीरसिंह गायकवाड यांनी राष्ट्रवादीची फौज सत्यजित पाटील यांच्या प्रचारात उतरविली आहे. दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष रमेश चांदणे, शेकापचे भारत पाटील यांनीदेखील सेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. गतनिवडणुकीत विनय कोरे यांना शाहूवाडीतून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर, नामदेव खोत यांच्या प्रयत्नांमुळे २४ हजार मते मिळाली होती. कानसा खोऱ्यात सत्यजित पाटील यांना वाढणारी मते रोखण्याचे काम कोरे यावेळी करीत आहेत. कोरे यांच्या प्रचाराची धुरा सर्जेराव पाटील, नामदेव खोत सांभाळत आहेत. येथे खरी लढत आमदार विनय कोरे व सत्यजित पाटील यांच्यात शाहूवाडीत होणार आहे.
एकंदरीत पन्हाळ्यातील मतविभागणीच शाहूवाडी-पन्हाळ्याचा आमदार कोण होणार हे ठरविणार आहे.

Web Title: Dhoreshana between Kore-Patil - Total voters in Shahuwadi, 2,66,772

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.