मी धर्मसंकटात : धनंजय महाडिक
By Admin | Updated: September 14, 2015 00:21 IST2015-09-14T00:21:01+5:302015-09-14T00:21:33+5:30
सारवासारव : तुम्हाला धर्मसंकटात टाकणार नाही; खुशाल परदेशी जा - हसन मुश्रीफ

मी धर्मसंकटात : धनंजय महाडिक
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मला खासदार केले, त्यासाठी काँग्रेस, ताराराणी आघाडीनेही मला मदत केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करायचा या धर्मसंकटात आहे, अशी अवस्था खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमात व्यक्त केली. यावेळी, मी तुम्हाला कोणत्याही धर्मसंकटात टाकू इच्छीत नाही, त्यामुळे तुम्ही खुशाल परदेश दौरा करावा. आमच्या वतीने त्यासाठी शुभेच्छा आहेत, अशा शब्दात माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांची अडचण दूर केली. निमित्त होते, विचारेमाळ-सदर बाजार येथील पंचशील भवन आणि बुद्धशिल्प उद्घाटन सोहळ्याचे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून खासदार महाडिक गायब होते. शिवाय आमदार मुश्रीफ आणि ते कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसत नव्हते. अगदी पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळीही महाडिक अनुपस्थित होते. त्यावेळी मुश्रीफ यांनीही महाडिक यांच्याबाबत बोलणे टाळले होते. त्यामुळे गेले काही दिवस खासदार महाडिक आणि आमदार मुश्रीफ यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दोघांच्या हस्ते उद्घाटनाचे कार्यक्रम झाले; त्यानंतर व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसले असतानाही दोघांनीही पहिली २० मिनिटे एकमेकांकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यानंतर खासदार महाडिक यांनी भाषणात प्रथम मुश्रीफ यांचा उल्लेख करताना तुम्हा-आम्हा सर्वांचे मुश्रीफसाहेब हे नेते असल्याचा उल्लेख केला. तसेच आमदार हसन मुश्रीफ आणि माझ्यात कोणताही दुरावा नसल्याचे सांगत, मला लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह मुश्रीफ, तसेच काँग्रेस आणि ताराराणी आघाडीनेही मदत केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत कोणाच्या प्रचारात उतरायचे, अशा धर्मसंकटात सापडलो आहे; पण आमचे नेते हे मुश्रीफच राहतील, असे त्यांनी सांगितले.
याला उत्तर देताना आमदार हसन मुश्रीफ यांनी, आपल्यात आणि धनंजय महाडिक यांच्यात कोणतीही धुसफुस नसल्याचा खुलासा करताना, महाडिक यांचे चुलते महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे आमदार, तर चुलत भाऊ अमल हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे मी त्यांना धर्मसंकटात टाकू इच्छीत नाही. ते अनेक वर्षे ‘ताराराणी’त होते. आता राष्ट्रवादीत आहेत. ते अडचणीत येऊ नयेत म्हणून मीच त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे; पण मी शरद पवार यांचाच सैनिक आहे.
पवारसाहेब कोणत्याही पक्षात असोत, मी त्यांच्या नेहमीच सोबत राहिलो आहे. मी राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी नेहमीच प्रयत्न करणार आहे.
आता मी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहे. मी महाडिक यांना संकटात आणू इच्छीत नाही, परदेशी दौरा आटोपता घेत त्यांनी पक्षाचे कार्य पुढे सुरू ठेवावे, असे सांगून मुश्रीफ यांनी पुन्हा महाडिक यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा केला.
एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न
रविवारी सदर बाजारमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्हीही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
या दोघांत महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जुगलबंदी रंगणार, असे वातावरण असताना दोन्ही नेत्यांनी एकमेकाला सावरण्याचा प्रयत्न केला.
दोघांनीही भाषणातून खुलासा करताना आमच्यात कोणताही दुरावा नसल्याचा उल्लेख केला.