विश्व संस्कृती महोत्सवात धनगरी ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 00:39 IST2016-03-09T00:39:38+5:302016-03-09T00:39:38+5:30

पथक दिल्लीला रवाना : कोल्हापुरातील ११५० जणांचा सहभाग

Dhanjari Dhol at the World Culture Festival | विश्व संस्कृती महोत्सवात धनगरी ढोल

विश्व संस्कृती महोत्सवात धनगरी ढोल

कोल्हापूर : ‘दि आर्ट आॅफ लिव्हिंग’ला ३५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत ११ ते १३ मार्चदरम्यान होणाऱ्या विश्वसंस्कृती महोत्सवानिमित्त १५५ देशांतून ३३ हजार कलाकार सहभागी होत आहेत. या महोत्सवात कोल्हापुरी धनगरी ढोल पथकही सहभागी होणार आहे. यानिमित्त आज, मंगळवारी कोल्हापुरातून ११५० धनगरी ढोलचे पथक विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाले.
राजर्षी शाहू महाराज छत्रपती टर्मिनल्स येथे सकाळी या पथकाला महापौर अश्विनी रामाणे, अरुंधती महाडिक, मौसमी आवाडे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक जयंत पाटील, आर्ट आॅफ लिव्हिंगचे राजश्री भोसले-पाटील, डिंपल गजवानी, राजेंद्र लकडे, विनायक मुरदंडे, अजय किल्लेदार, सुरेखा हिडदुग्गी, पूनम मालपाणी, जगदीश सोमय्या, शेखर मुदंडा यांनी शुभेच्छा दिल्या.
दिल्लीतील सात एकरांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या संस्कृती महोत्सवासाठी एकूण ३५ लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, ११ मार्चला धनगरी ढोलने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत दिल्लीत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात विविध देशांतील सुमारे ३३ हजार कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे.
कोल्हापुरातून ११५० धनगरी ढोलवादकांचे पथक एकाच वेळी रेल्वेने रवाना झाले. जागतिक मंचावर कलाप्रदर्शन करायला निघाल्यामुळे धनगरी ढोलवादकांचा आणि आर्ट आॅफ लिव्हिंगचे सगळे प्रशिक्षक, व्हॉलंटिअर्स यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते. धनगरी पथकांचा सराव व सोयी - सुविधांसाठी मानसिंग जाधव आणि प्रशांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Dhanjari Dhol at the World Culture Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.