धनगर समाज रस्त्यावर
By Admin | Updated: July 26, 2014 00:35 IST2014-07-25T23:44:48+5:302014-07-26T00:35:42+5:30
आरक्षणाची मागणी : कुरुंदवाडमध्ये पिचड व वळवी यांच्या पुतळ्याचे दहन; इचलकरंजीत निदर्शने

धनगर समाज रस्त्यावर
इचलकरंजी : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज, शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही मंत्र्यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. तसेच सोमवारी (दि. २८) तहसील कार्यालय व बुधवारी (दि. ३०) प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
येथील बिरदेव मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मेन रोडने मोर्चा के. एल. मलाबादे चौकात आला. तेथे सभेत रूपांतर झाले. यावेळी आरक्षणाला विरोध करणाऱ्या आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व क्रीडामंत्री पद्माकर वळवी या नेत्यांच्या विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
यावेळी झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष अशोक आरगे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, ध्रुवती दळवाई, कल्लाप्पाण्णा गावडे, मलकारी लवटे, नागेश पुजारी, आदींनी केले.
यावेळी मोर्चामध्ये प्रकाश पुजारी, कोंडिबा बंडगर, धुळाप्पा पुजारी, रावसाहेब पुजारी, सदानंद दळवाई, संदीप कारंडे, कृष्णा पुजारी, आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरुंदवाड : धनगर समाजासाठी ‘ळ’ आणि ‘ड’ करण्यात महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने ६५ वर्षे घालवून या समाजावर अन्याय केला आहे. मात्र, आज धनगर समाज जागा झाला असून एकत्र आला आहे. या समाजाला एस.टी. प्रवर्गात सामावून घ्यावे. अन्यथा, येत्या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीला आम्ही जागा दाखवू. मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी यांनी आमच्या आडवे येऊ नये. त्यांनी शासनाकडे आपले हक्क मागावेत. अन्यथा, गुर्जर समाजास आंदोलनाला समोरे जावे लागेल, असा इशारा माजी नगराध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा धनगर समाजोन्नतीचे रामचंद्र डांगे यांनी दिला.
धनगर समाजाला ‘आदिवासी’ म्हणून दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करताना मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी यांनी विरोध केला. त्यांचा निषेध म्हणून आज, शुक्रवारी येथील पालिका चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष संजय खोत, आण्णासाहेब डांगे यांची भाषणे झाली. याप्रसंगी बाबासो सावगावे, उमेश कर्नाळे, उदय डांगे, कुमार बावचे, तानाजी आलासे, पांडुरंग धनगर, केरबा प्रधाणे, सुरेश गावडे, चंद्रकांत कोळेकर, नंदू प्रधाण, अमोल बंडगर, शिवाजी कटमरे, मुकुंद सावगावे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)