आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर
By Admin | Updated: August 6, 2014 00:40 IST2014-08-06T00:33:49+5:302014-08-06T00:40:30+5:30
भर पावसात मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी

आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर
कोल्हापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसात ‘यळकोट यळकोट जय मल्हार...बिरोबाच्या नावानं चांगभलं...’या जयघोषासह धनगर वाद्यांच्या गजरात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतून आलेले दीड हजारांहून अधिक धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. पिवळे झेंडे, कपाळी भंडारा, पिवळ्या टोप्या त्यावर दोन्ही बाजूला मी धनगर व ‘एसटी’ आरक्षण मिळालेच पाहिजे, असे घोषवाक्य. धनगरी ढोल व कैताळांचा आवाज अशा वातावरणात निघालेल्या मोर्चात धनगर बांधवांची संख्या लक्षणीय होती. घोषणाबाजी करत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यातच भर पावसातही आंदोलकांचा उत्साह दांडगा होता. या ठिकाणी धनगर समाजातील मान्यवरांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
समाजशास्त्रज्ञ ईरावती कर्वे आणि मानवशास्त्रज्ञ कोलनल डेलस्टॉन यांनी केलेल्या संशोधनानुसार १८७२ पासून धनगर समाजाचे वास्तव्य आहे. हा समाज अत्यंत मागास असल्याचे वर्णन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर आणि धनगड जमात एकच असून, आम्हाला इतरांचे काढून आरक्षण नको आहे. घटनेने दिलेले अनुसूचित जमातींच्या सूचितील हक्काचे आरक्षण हवे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात बाबूराव हजारे, अशोकराव कोळेकर, विलासराव वाघमोडे, नगरसेवक सत्यजित कदम, रामभाऊ डांगे, बाबासाहेब सावगावे यांच्यासह धनगर बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)