धनगर समाजाचा उद्या चक्का जाम

By Admin | Updated: August 12, 2014 23:51 IST2014-08-12T23:50:22+5:302014-08-12T23:51:34+5:30

तावडे हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणार

Dhangar community's tomorrow | धनगर समाजाचा उद्या चक्का जाम

धनगर समाजाचा उद्या चक्का जाम

कोल्हापूर : धनगर समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून गुुरुवारी (दि. १४) सकाळी अकरा वाजता कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतील, असा निर्धार आज, मंगळवारी येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आला.  कोल्हापूर जिल्हा धनगर आरक्षण कृती समितीतर्फे शाहू स्मारक भवन येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आरक्षण कृती समितीचे संपर्कप्रमुख भीमसेन ऊर्फ बिरदेव बिरुंगळे होते. धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश आहेच, फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे. तरीही राज्यकर्त्यांनी गेल्या ६५ वर्षांत समाजाची फसवणूक केली. आता धनगर समाज पेटून उठला आहे. ते आरक्षण घेतल्याशिवाय तो गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मेळाव्यात संपर्कप्रमुख भीमसेन बिरुंगळे यांनी धनगर समाजाच्या आंदोलनाचा आढावा घेतला. पंढरपूर ते बारामतीत निघालेला मोर्चा आणि त्यांनतर झालेले बेमुदत उपोषण याचीही माहिती त्यांनी दिली. आमच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला; परंतु या आंदोलनात गट, तट, पक्ष, भेद बाजूला ठेऊन राज्यातील धनगर समाज, धनगर हाच आपला पक्ष मानून एका झेंड्याखाली एकत्र आला आहे.  राज्य कृती समिती ज्या पद्धतीने आदेश देईल, त्या पद्धतीने कोल्हापुरात लढा उभारला जाईल, अशी ग्वाही प्रा. लक्ष्मणराव करपे यांनी दिली. चक्का जाम आंदोलनाची तीव्रता वाढावी म्हणून हे आंदोलन राष्ट्रीय महामार्गावर करण्याचा संकल्प नागेश पुजारी यांनी केला. समाजाच्या भल्यासाठी आरक्षण मागत असल्यामुळे धनगरांनी मोठ्या संख्यने चक्का जाम आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बबनराव रानगे यांनी केले. यावेळी शहाजी मोटे, भीमराव अनुसे, अ‍ॅड. विजय खरात, छगन नांगरे यांचीही भाषणे झाली. यावेळी बयाजी शेळके बापूराव लोखंडे, जयराम पुजारी, शहाजी सीद, छगन नांगरे, आदी उपस्थित होते.

Web Title: Dhangar community's tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.