शिरोळमध्ये धनगर समाजाचा मोर्चा

By Admin | Updated: July 31, 2014 00:51 IST2014-07-31T00:50:21+5:302014-07-31T00:51:31+5:30

प्रश्न आरक्षणाचा : शिरोळ तहसीलवर शेळ्या-मेंढ्यांसह समाजबांधवांची धडक

Dhangar community front in Shirol | शिरोळमध्ये धनगर समाजाचा मोर्चा

शिरोळमध्ये धनगर समाजाचा मोर्चा

शिरोळ : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी शिरोळ तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने बकरी, मेंढ्यासह आज, बुधवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाने याप्रश्नी त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात मोठा उद्रेक पाहावा लागेल, असा इशारा कृती समितीने दिला.
येथील शिवाजी चौकात सकाळी अकरा वाजता धनगर समाज बांधव एकत्र आले. कपाळावर भंडारा, खांद्यावर घोंगडी अशा पेहरावात, तर हातात मागण्यांचे फलक घेऊन धनगरी ढोलवादनासह मोर्चात सहभागी झाले होते. पारंपरिक धनगर समाजातील वेशभूषेत असणाऱ्या काही तरुणांनी हातात कुऱ्हाड घेतली होती. तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी आ. डॉ. सा. रे. पाटील म्हणाले, धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. यासाठी मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी जि. प. सदस्य धैर्यशील माने, स्वाभिमानीचे सावकर मादनाईक, उल्हास पाटील, सुभाष शेट्टी, नगरसेविका मनीषा डांगे, माधुरी सावगावे, दशरथ काळे, एम. एस. गवंडी, डॉ. संजय पाटील, आदींनी धनगर समाजाच्या मागणीस पाठिंबा दिला. आ. डॉ. सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कृती समितीचे अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष मयाजीराव बेडगे, निमंत्रक शाम बंडगर, संयोजक शिवाजी ठोंबरे, दादासो पाटील, अमर पुजारी, राजू पांढरे, रामचंद्र डांगे, अशोकराव कोळेकर, कल्लाप्पा गावडे, देवाप्पा पुजारी, रघुनाथ देशिंगे, आप्पा बंडगर, रामचंद्र उगारे, गजानन करे, वसंत हजारे या प्रमुखांनी तहसीलदार सचिन गिरी यांना मागण्यांचे निवेदन दिले. तहसीलदार गिरी यांनी आपल्या भावना शासनाला कळवू, असे आश्वासन दिले. या मोर्चात बच्चू बंडगर, दरगू गावडे, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष संजय खोत, अस्लम मुल्ला, सुनील शेळके, रमेश शिंदे, सुनील कुरुंदवाडे, शिवसेनेचे सतीश मलमे, आण्णासाहेब बिल्लोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dhangar community front in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.