Sambhajiraje Chhatrapati ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना उलटला आहे. पण, अजूनही एक मुख्य आरोपी फरार आहे. या प्रकरणातील आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मीक कराड याच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली आहे, यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आज मुंडे यांच्यावर टीका केली असून नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
एकीकडे शिंदें 'शिवोत्सव' साजरा करणार; दुसरीकडे ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देणार?
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, वाल्मीक कराड याच्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करुन मकोकाचा गुन्हा नोंद व्हावा गरजेचा आहे, त्याशिवाय काही पर्याय नाही. यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आता अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. धनंजय मुंडे यांनी नैतिक दृष्टीने राजीनामा दिला पाहिजे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा
"धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन माझा त्यांचा काही संबंध नाही असं सांगायला पाहिजे. अजित पवार या मंत्र्यांना काही मदत करत आहेत हे समजत नाही. त्यांना पालकमंत्री देत नाहीत, यातूनच संजून घ्यावे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की, सगळ्यांना मकोका लावणार पण एकाच आरोपीला खंडणी प्रकरणात मकोका लावला आहे. लवकरात लवकर त्यांच्यावर ३०२ लावावे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
कृष्णा आंधळेला पोलिसांनी वान्टेड घोषित केला
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांची पथकांनी महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात त्याचा शोध सुरू केला आहे. पण, अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. यामुळे आता पोलिसांनी कृष्णा आंधळे यांला वान्टेड घोषित केले आहे. त्याला शोधून देणाऱ्याला बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कालपासून वाल्मीक कराड याची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला सर्दी आणि ताप आला आहे. यामुळे आता कोर्टाने CPAP मशिन वापरण्यास कोर्टाने मंजूरी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता तपासाला आणखी वेग आला आहे.