‘सुटा’चे शिवाजी विद्यापीठात धरण
By Admin | Updated: November 25, 2014 00:30 IST2014-11-25T00:17:12+5:302014-11-25T00:30:00+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन : तीन जिल्ह्यातील प्राध्यापकांचा सहभागे

‘सुटा’चे शिवाजी विद्यापीठात धरण
कोल्हापूर : ‘प्रलंबित मागण्या मान्य करा’, ‘आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) आज, सोमवारी शिवाजी विद्यापीठात धरणे आंदोलन केले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांंतील सुमारे दोनशे प्राध्यापक सहभागी झाले होते.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर प्राध्यापकांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नेट-सेटमुक्त प्राध्यापकांची विनाविलंब स्थान निश्चिती करून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. बेकायदेशीरपणे रोखलेला पगार विनाविलंब अदा करावा. १४ हजार ९४० रुपयांच्या वेतनश्रेणीची ताबडतोब अंमलबजावणी करावी, आदी विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांनी वारंवार लेखी आश्वासने देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. वेळकाढू धोरणाचा निषेधार्थ ‘एमफुक्टो’ने स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले. त्याचाच टप्पा म्हणून आजचे धरणे आंदोलन केले.
दरम्यान, निवेदन दिल्यानंतर निषेध सभा झाली. त्यात ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. एन. के. मुल्ला यांनी उपस्थितांना आंदोलनाची, संघटनेने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
यावेळी कार्यालय कार्यवाह डॉ. एस. ए. बोजगर, उपाध्यक्ष आर. डी. ढमकले, यु. एस. वाघमारे, एस. एम. पवार, सहकार्यवाह आर. बी. कोरबू, प्रमुख कार्यवाह आर. एच. पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘एमफुक्टो’च्या मागण्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत १९ नोव्हेंबरला सकारात्मक चर्चा झाली. पण, अंमलबजावणीबाबत कालबद्ध पद्धतीने निर्णय घेण्याबाबत आश्वासन टाळले आहे. त्यामुळे २४ आॅगस्ट २०१४ रोजीच्या ‘एमफुक्टो’च्या ठरावानुसार पूर्वनिर्धारीत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. नव्या सरकारने मागण्यांबाबत शासननिर्णय द्यावेत. आंदोलन तीव्र केले जाणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर १ डिसेंबरला धरणे आंदोलन केले जाईल.
- प्रा. एन. के. मुल्ला (अध्यक्ष, सुटा)