‘जन-धन’मध्ये कधी येणार 'धन'
By Admin | Updated: November 25, 2014 23:56 IST2014-11-25T23:15:57+5:302014-11-25T23:56:46+5:30
विम्याचा लाभ गुलदस्त्यात : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून बँकांना नाहीत मार्गदर्शक सूचना

‘जन-धन’मध्ये कधी येणार 'धन'
संदीप खवळे - कोल्हापूर -सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजनें’तर्गत बँक खाती उघडून साडेतीन महिने होत आले तरी, अपघाती विम्याच्या प्रक्रियेबाबत बँकांना कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत़ शून्य बॅलेन्सवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेला प्रतिसाद मिळण्यासाठी मोदी सरकारने अपघाती विमा संरक्षणाचे गाजर दाखविले होते़ अपघाती विम्याचा हप्ता सरकारच्यावतीने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन भरणार आहे, पण या कॉर्पोरेशनकडून बँकांना तसेच संबंधित विमा कंपन्यांना अपघाती विम्याच्या अदायगीबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत़ त्यामुळे जन-धन योजनेंतर्गत खाते उघडलेल्या एखाद्या खातेधारकाचा अपघात झाल्यास तूर्तास तरी त्याला जन-धन योजनेचा लाभ मिळणार नाही़
जन-धन योजनेंतर्गत १५ आॅगस्ट २०१४ पासून शून्य बॅलेन्सवर खाती उघडण्याची प्रक्रिया देशभरात राबविण्यात आली़ या योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील लीड बँकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व बँकांत आॅक्टोबरअखेर ९५,०९१ खाती उघडण्यात आली आहेत़ त्यातील ६३,४३८ खाती ग्रामीण भागातील आहेत़ संपुआ सरकारच्या काळातही बँकेच्या प्रवाहात नसलेल्या नागरिकांना बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक समावेशन योजना गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ जन-धन योजनेचा उद्देशही तोच आहे़ एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, तीस हजार रुपयांचा जीवन विमा, पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट हे लाभ या योजनेत समाविष्ट आहेत़
जन-धन योजनेंतर्गत खाती उघडण्याची सुरुवात १५ आॅगस्टला करण्यात आली़ कोल्हापूर जिल्ह्यातूनही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला, पण खाती उघडून साडेतीन महिने होत आले तरी, अपघाती विम्याबाबत कोणतीही सूचना बँकांना प्राप्त झालेली नाही़ अपघात विम्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया सरकारच्यावतीने खातेधारकांचे हप्ते भरणार आहे़ बँकांकडील खाती कोणत्या विमा कंपन्यांशी जोडायची याचीच प्रक्रिया सुरू आहे़ त्यामुळे सद्य:स्थितीत एखाद्या खातेधारकांचा अपघात झाला, तर त्याला जन-धन योजनेखाली एक लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार नाही,
असेच चित्र असल्याची माहिती
सूत्रांनी दिली़
खातेदाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला मात्र जन-धन योजनेतील ३० हजार रुपये विमा रक्कम मिळणार आहे़ या विम्याची रक्कम एलआयसी भरणार आहे़ त्यासाठी एलआयसी आपल्याकडील राखीव असलेल्या शंभर कोटी रुपयांचा राखीव निधी वापरणार आहे़ याबाबत शासनाने एलआयसीला मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची आठ दिवसांत अंमलबजावणी होणार आहे़
विम्याचा लाभ मिळण्यासाठी...
अपघाती विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खातेदाराला ४५ दिवसांनी खात्यावरून व्यवहार करावे लागणार आहेत. तसेच रूपे कार्डाचा वापर आवश्यक आहे़ रूपे कार्ड नसल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच सहा महिने खात्यावर काही व्यवहार करावे लागणार आहेत़
पंतप्रधान जन-धन विमा योजनेंतर्गत एक लाख रुपयाच्या अपघाती विमा संरक्षणाच्या प्रक्रियेबाबत अद्यापही कोणत्याही मार्गदर्शक सूचना बँकांना प्राप्त झालेल्या नाहीत़ अपघाती विम्याच्या रकमेचा हप्ता विमा कंपन्यांना देण्याची जबाबदारी शासनाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडे सोपविली आहे
- एम़ जी़ कुलकर्णी, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, बँक आॅफ इंडिया
जिल्ह्यातील
जन-धनची स्थिती
९५,०९१ लीड बँकेच्या अखत्यारितील खाती
६३,४३८ ग्रामीण भागातील खाती