गडहिंग्लज तालुक्यातील विद्यमानांना ‘दे धक्का’
By Admin | Updated: October 7, 2016 23:49 IST2016-10-07T23:18:37+5:302016-10-07T23:49:47+5:30
आरक्षणाने उलथापालथ : नव्या चेहऱ्यांना संधी; नेसरीत मीनाताई जाधव यांचे पती उतरणार

गडहिंग्लज तालुक्यातील विद्यमानांना ‘दे धक्का’
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या विद्यमान पाचही सदस्यांना नव्या आरक्षणाचा फटका बसला आहे. पाचपैकी बड्याचीवाडी, हलकर्णी व भडगाव हे तीन गट सर्वसाधारण महिलेसाठी, तर गिजवणे गट इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. एकमेव नेसरी गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. एकंदरीत नव्या आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना संधी उपलब्ध झाली आहे.
पूर्वीच्या नूल-हसूरचंपू गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवप्रसाद तेली यांची जागा यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. कडगाव गटातील बड्याचीवाडी हे सर्वांत मोठे गाव गडहिंग्लज रानातील वस्तीसह या गटात समाविष्ट झाल्याने त्याच गावाचे नाव या गटाला देण्यात आले आहे आहे.
हलकर्णी गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जयकुमार मुन्नोळी यांची जागाही सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. त्याचप्रमाणे भडगाव गटाचे प्रतिनिधित्व करणारे अप्पी पाटील यांची जागादेखील सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे. यामुळे मुन्नोळी व अप्पी दोघांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे.
गिजवणे गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शैलजा सतीश पाटील यांची जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे यावेळी त्यांचीही संधी हुकली आहे. नेसरी गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीनाताई दीपक जाधव यांची जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली झाली आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांचे पती रिंगणात उतरू शकतात. (प्रतिनिधी)
नेसरी गटात चुरस
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नेसरी गट यावेळी खुला झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीतर्फे दीपक जाधव, शिवसेनेतर्फे संग्रामसिंह कुपेकर, भाजपतर्फे हेमंत कोलेकर, तर काँगे्रसतर्फे विद्याधर गुरबे हे मातब्बर उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गटात चुरशीचा सामना होईल.