पेठवडगावसाठी दहा कोटींची नगरोत्थानमधून विकासकामे
By Admin | Updated: August 8, 2014 00:42 IST2014-08-07T21:59:20+5:302014-08-08T00:42:12+5:30
नगरपालिका सभा : विविध कामांना मंजुरी

पेठवडगावसाठी दहा कोटींची नगरोत्थानमधून विकासकामे
पेठवडगाव : वडगाव नगरपालिका सभेत नगरोत्थानमधून रस्ते, गटर्स, स्मशानभूमी, दलित वस्ती अंतर्गत रस्ते व गटर्स, सुधारित पाणीपुरवठा अशा सुमारे दहा कोटींच्या प्रस्तावित विकासकामांना एकमताने मंजुरी देण्यात आली. आज, गुरुवारच्या सभेत किरकोळ अपवाद वगळता सभा खेळीमेळीत झाली.
नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये विषयपत्रिकेवरील १२, तर आयत्या वेळच्या सहा विषयांवर चर्चा करीत निर्णय घेण्यात आले. प्रश्नोत्तरामध्ये नगराध्यक्षा पोळ यांनीच मोकाट जनावरांचा प्रश्न मांडला. यावर कारवाई केली का, असा थेट प्रश्न प्रशासनास विचारला. यावेळी संबंधित संशयित जनावरे मालकांना मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशा नोटिसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संतोष गाताडे यांनी सणगर-कुंभार गल्लीतील रखडलेल्या शौचालयाचा प्रश्न मांडला. यामुळे दोन समाजात गैरसमजातून तेढ पसरत असल्याचे सांगितले. यावेळी प्रशासनाने हा प्रश्न न्यायप्रविष्ठ झाल्याचे सांगितले.
यावर रंगराव पाटील-बावडेकर यांनी पालिका प्रशासन प्रत्येक गोष्टीत कायदेशीर सल्ला घेते, असा टोला हाणला. यापुढे नागरिकांच्या विकासकामांत अडथळे येऊ नयेत यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी अशा अनेक संभावित प्रश्नाबाबत न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी मैलखड्ड्यामध्ये अस्वच्छता पसरत आहे. त्याच्या नियोजनासाठी लोकसहभातून स्वच्छता करण्यास तयार आहोत. तसा ठराव करण्याचा आग्रह केला. यास रंगराव पाटील यांनी आक्षेप घेतला. यावेळी दोघांच्यात खडाजंगी झाली. विशेष म्हणजे तसे निवेदन विराधी नगरसेवक सुनीता पोळ यांच्यावतीने दिले होते. अखेरीस हा विषय प्रलंबित ठेवून त्यावर पडदा पडला. यावेळी झालेल्या चर्चेत विजयसिंह यादव, सुनील हुक्केरी, राजकुमार पोळ, विश्रांत माने, राजेंद्र देवस्थळी, निर्मला सावर्डेकर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)