विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास : विद्यामंदिर, धुंदवडे

By Admin | Updated: July 12, 2015 21:20 IST2015-07-12T21:20:52+5:302015-07-12T21:20:52+5:30

गुणवंत शाळा

The development of the students: Vidyamandir, Dhondawade | विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास : विद्यामंदिर, धुंदवडे

विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास : विद्यामंदिर, धुंदवडे

धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील विद्यामंदिर शाळा ‘सर्वांगीण विकास - हाच आमचा ध्यास’ हे उद्दिष्ट घेऊन कार्यरत आहे. स्वच्छ, सुंदर, हिरवी शाळा, असे विविध पुरस्कार शाळेला मिळालेले आहेत. तीन शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले आणि शाळेचा शैक्षणिक, सर्वांगीण गुणवत्ता विकास करण्याच्या ध्यासाचे हे फलित त्यांना मिळाले आहे.
शाळेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे वेध भविष्याचा अधिकारी घडविण्याचा. या उपक्रमाची उद्दिष्टे म्हणजे स्पर्धा परीक्षेचा पाया तयार करणे, विद्यार्थी शोधक, जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या मनात अधिकारी बनण्याचे स्वप्न निर्माण करणे ही आहेत. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. शाळेच्या ‘वेध भविष्याचा’ फलकावरती दररोज सामान्यज्ञानाचे पाच प्रश्न लिहिले जातात. हे पाच प्रश्न विद्यार्थी आपल्या स्वतंत्र वहीत लिहून काढतात. दिवसभरात या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संदर्भ पुस्तके वाचतात. दररोजच्या पाच प्रश्नांचे महिन्यात १५० प्रश्न तयार होतात. या प्रश्नांवर महिन्याच्या शेवटी परीक्षा घेतली जाते. अशा पद्घतीने वर्षात जवळजवळ १५०० प्रश्न तयार होतात. वर्षाच्या शेवटी परीक्षा घेऊन पहिल्या दहा विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य पारितोषिक व पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला ‘वेध भविष्याचा अवॉर्ड’ दिला जातो. या उपक्रमाची फलश्रृती म्हणजे सर्व विद्यार्थ्यांत आकलनात्मक वाचनाची आवड निर्माण झाली. स्पर्धा परीक्षेचा पाया निर्माण होण्यासाठीची पार्श्वभूमी तयार होत आहे.येथील साहित्य संगीत कवायत ही तर पाहण्या, ऐकण्यासारखीच आहे. दर शनिवारी शारीरिक शिक्षण तासाला डंबेल्स, बांबू, लेझीम, झांज, घुंगरकाठ्या चक्रे यांचा वापर केला जातो व ही कवायत संगीताच्या तालावर, गाण्याची साथ घेतली जाते. विद्यार्थ्यांचे तन्मय होणे, एकचित्ताने भारून जाणे हा अनोखा अनुभव. कलाविकास दालन’ हे तर संगीत साहित्यासाठी आहे. तसेच प्रत्येक वर्गाने केलेले पशुपक्षी चित्रसंग्रह, रांगोळी, मेहंदी, चित्रसंग्रह या दालनात आहेत.पालक सभा, माता पालकसभा शिक्षकांची मानसिक, भावनिक गुंतवणूक करून घेतल्या जातात. खुली चर्चा व प्रोसेडिंग व्यवस्थित ठेवण्याकडे मुख्याध्यापक व शाळेचा कल जाणवला. डिजिटल वर्ग, लॅपटॉप, सहा संगणक हे शैक्षणिक उठावातून आणि लोकसहभाग खूप चांगला आहे. कारण शाळेने पालक व नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या मनात शाळेची गुणवत्ता वाढविण्यातून विश्वास निर्माण केलेला आहे. रक्तदान शिबिर व त्यात गावचा सहभाग हे तर मुलांसाठी आदर्श निर्माण करणारे आहे.
टाकाऊपासून टिकाऊ साहित्य करणारे विद्यार्थी आणि शैक्षणिक साहित्य विकत न आणता मुलांच्या मदतीने करणारे शिक्षक इथे असल्याने शाळा ही गुणवत्तेच्या विशिष्ट उंचीवर पोहोचली आहे. जेवणापूर्वी श्लोक, स्वच्छ हात धुऊन भोजन, शिस्तबद्घ बैठक असे आरोग्यदायी व भावनिक स्वास्थ्याचे धडे पोषण आहाराच्या रूपाने दिले जात आहेत. पालकांसमवेत सहभोजन, प्रशस्त वर्गखोल्या, पुरेसा उजेड, मोकळी हवा, शाळेची दमदार कमान आणि लोखंडी गेट, क्रीडांगण अशी ही जिल्हा परिषदेची शाळा आणि तसेच गुणवत्तेसाठी शिक्षक आणि स्वयंअध्ययन व स्वहिततत्परतेने शिस्तप्रिय झालेले विद्यार्थी असा हा त्रिवेणी संगम. भौतिक साधने व वापर आणि सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यात अग्रेसर असलेली शाळा ही जिल्हा परिषदेची आहे यावर विश्वास बसणार नाही.
- डॉ. लीला पाटील


शाळेची वैशिष्ट्ये
संगीताच्या साथीत परिपाठ घेतला जातो. वाद्य विद्यार्थी वाजवितात.
पहिलीपासून सर्व विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्यासाठी दिला जातो. चित्रे काढणे, खेळ खेळणे, अक्षरे लिहिणे, स्लाईड बनविणे, आदी शिकविले जाते.
विविध सी.डीं.द्वारा अभ्यासक्रमही शिकविला जातो. शाळेची सर्व कामे संगणकावरच केली जातात.
‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रयोगशाळा’ अशी स्वतंत्र आहे. स्वत: विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग शाळेमध्ये मांडलेले आहेत.
मर्दानी खेळामध्ये मुलींचा विशेष कल असून, मुलींचे लेझीम अप्रतिम आहेच. मानवी मनोरे पाहून त्यांच्या स्नायंूचा लवचिकपणा, मनाची एकाग्रता व धाडस प्रकर्षाने जाणवते.
झांजपथक,लाठी फिरविणे, काठीवर चालणे, आदी
मर्दानी प्रयोगातील मुलांचे कौशल्य थक्क करणारे
आहे.
‘स्वामी विवेकानंद वाचनालय’ या नावाने शाळेत स्वतंत्र वाचनालय आहे. गोष्टी, गाणी यांपासून ते चरित्रे, डिक्शनरी उपलब्धता, पुस्तके आहेत. सर्व रेकॉर्ड मुलेच ठेवतात.
वर्षातून दोनवेळा बालसभा भरवली जाते. सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यातून कलागुणांच्या आविष्काराची संधी दिली जाते.
‘रात्र अभ्यासिका’ सुरू असण्यातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून अभ्यासू वृत्ती, बैठक यांचा सराव मिळत आहे. बोलके व्हरांडे व चित्रमय वर्ग पाहून शाळा शिक्षण व गुणवत्ता याबाबतीत तत्पर आहे.

Web Title: The development of the students: Vidyamandir, Dhondawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.