लोकसहभागातून विकास : कन्या विद्या मंदिर, यळगूड

By Admin | Updated: July 6, 2015 00:29 IST2015-07-05T23:44:48+5:302015-07-06T00:29:17+5:30

--गुणवंत शाळा

Development from people's participation: Kanya Vidya Mandir, Yalgud | लोकसहभागातून विकास : कन्या विद्या मंदिर, यळगूड

लोकसहभागातून विकास : कन्या विद्या मंदिर, यळगूड

यळगूड (ता. हातकणंगले) येथील कन्या विद्या मंदिर ही मुलींची शाळा शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी कटिबद्ध झाली आहे. मुलींची प्रगती, कौशल्य, उपक्रमातील सहभाग यांच्यातून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे योगदान मोठे आहे. ३८५ पटसंख्या असलेली मुलींची ही शाळा असून प्रशस्त इमारत, समोरच ग्राऊंड आणि स्वागताला कमान आहे.
कन्या शाळा ही मुलींची असली, तरी विविध स्पर्धा, खेळ, क्रीडा, व्यायाम यामध्ये विशेष प्रावीण्य मिळविण्यात त्या अग्रेसर असल्याचे दिसले. मुलींचे मानवी मनोरे, योगासने, लाठी-काठीचे हात व प्रकार पाहून त्यांचा आत्मविश्वास, ऊर्जा, जिद्द, इच्छाशक्ती लक्षणीय असल्याचे जाणवले. यामध्ये निदेशकाचे योगदान महत्त्वाचे आहे. फुटबॉल, खो-खो, रिले, लांब उडी, उंच उडी, अशासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये मुलींनी भरघोस यश मिळविले असल्याचे सर्टिफिकेट, मेडल यावरून लक्षात आले. जिल्हा स्तरावर, ग्रामीण युवा खेल अभियान (पायका), तालुका पातळीवर मुलींनी क्रीडा स्पर्धांमध्ये मिळविलेले क्रमांक हे शाळेसाठी अभिमानास्पद आहेत. शारीरिक शिक्षण निदेशक उदय कुडाळकर यांना याचे सर्व श्रेय देऊन, त्यांची शिकविण्याची पद्धत, सराव यासाठी वेळ देणे, झोकून देणे याबद्दल यळगूडवासीय आत्मियतेने बोलतात. बाह्य क्रीडा स्पर्धांमध्ये या शाळेतील मुलींनी ठसा उमटविला आहे. मुली या लाजऱ्या, मैदानावर उतरत नाहीत, खेळांच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला उत्सुक नसतात, पालक परवानगी देत नाहीत, अशा तऱ्हेची कारणे देणारे शिक्षक आणि नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणाऱ्यांनी यळगूड शाळा पाहावी व त्यातून स्वत: बोध घ्यावा.
यळगूड शाळा व शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे लक्ष पुरविले आहे. विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थिनी चमकत आहेत. गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थिनी ही शाळेची शान आहे. प्रत्येक वर्गातील अप्रगत मुलींची संख्या अत्यल्प असून, त्यांचेही जादा तास घेतले जातात.
पालकांचे शाळेला सहकार्य लाभले आहे. विशेष करून शिक्षकांवर विश्वास आहे. उगीच कोण कोणावर विश्वास टाकतो? ते तर विश्वास ही देण्या-घेण्याची गोष्ट आहे. शिक्षकांनी विश्वास दिला म्हणून पालकांनी दिला. शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्य हे सुद्धा विश्वासाने निर्माण झालेले. लोकप्रतिनिधींचे साह्य व लक्ष असणे या मागील कारण काय? तर विद्यार्थिनींची गुणवत्ता केंद्रस्थानी ठेवून शिक्षक प्रयत्न आणि परिश्रम करीत आहेत.
शिक्षक दिनी विद्यार्थिनींनी शिक्षक बनून अध्यापन व शाळा चालविण्याचे काम केले. मुलींची भाषणे व विद्यार्थिनी शिक्षकांनी अध्यापन करताना आलेल्या अडचणी व अनुभव कथन केले. लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने सप्ताह साजरा करण्यात आला. तसेच लाल बहादूर जयंतीसुद्धा साजरी करण्यात आली. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आल्या. मुलींचा सहभाग उत्साहजनक होता. सर्व स्पर्धा व परीक्षकांचे नाव आणि सहीसह स्पर्धेचे मूल्यमापन व गुण यांचा व्यवस्थित तक्ता व क्रमांक याचे लिखित पाहायला मिळाले. वार्षिक स्नेहसंमेलनाचेही उत्कृष्ट नियोजन आणि ‘शब्दकळी’ या हस्तलिखिताचा प्रकाशन सोहळा विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या सुरुवातीला करण्यात आला.
यळगूड कन्या मंदिर म्हणजे लोकसहभाग, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, शाळा व्यवस्थापन समितीचे साह्य व नियंत्रण आणि सरपंच व सदस्यांचा मनापासून सहभाग हे याचे प्रतीक आहे.
- डॉ. लीला पाटील


शाळेची वैशिष्ट्ये
एल.सी.डी. व झेरॉक्स मशीन घेतले आहे. लोखंडी कपाट, बोअरवेल मारणे, प्लास्टिक खुर्च्या, रोटरी क्लबमार्फत स्पोर्ट किटस् हे सगळे लोकसहभागातून मिळालेले आहे.
‘ग्रामपंचायत सहभाग’ हा तर प्रकर्षाने जाणवला. सर्व मुलींना मोफत गणवेश देण्यात आले व त्यांचा समारंभ करण्यातून शाळेत कृतज्ञता व्यक्त करण्याचा भलेपणा दाखविला.
शाळेत संगणक लॅब, टी.व्ही. आहे. स्क्रीनवर मुलींचे कार्यक्रम पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे, हे सगळं मुली हाताळतात. कार्यक्रमासाठी त्या निवेदन करतात.
मुलींनी केलेले हस्तालिखित आहे. त्याला सुवाच्च अक्षर आणि साजेशी सजावटीची जोड आहे.
शाळेत रोजची कवायत जशी दिमाखदार तसेच अध्ययन व स्वयं अध्ययनातही मुलींची शिस्त बघायला मिळते.
पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर आहे. तसेच परिसरात व वर्गखोल्यामध्ये स्वच्छतेचा वास आहे.
मुलींवर श्रम संस्कार करणारे शिक्षक स्वत: राबणारे आहेत. शालेय व्यवस्थापन समिती सक्रिय, दैनंदिन कामावर नियंत्रण आणि चांगल्या कामासाठी प्रेरणा देणारी असल्याने शिक्षक आनंदी, उत्साही आहेत.
लोकवर्गणीतून कूपनलिका खोदणे व मोटारपंप बसविण्यातून शाळेतील विद्यार्थिनींना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

Web Title: Development from people's participation: Kanya Vidya Mandir, Yalgud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.