राजगोळी खुर्द बनणार विकासाचे मॉडेल

By Admin | Updated: December 9, 2014 23:23 IST2014-12-09T22:01:06+5:302014-12-09T23:23:57+5:30

धनंजय महाडिक यांच्याकडून दत्तक : कन्नड भाषेचा प्रभाव ठरतोय राजगोळीच्या विकासातील अडथळा

The development model of the Rajgoli khurda will be built | राजगोळी खुर्द बनणार विकासाचे मॉडेल

राजगोळी खुर्द बनणार विकासाचे मॉडेल

नंदकुमार ढेरे : चंदगड :महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर वसलेल्या व विकासापासून वंचित असलेल्या राजगोळी खुर्द (ता. चंदगड) या गावची निवड खासदार धनंजय महाडिक यांनी करून सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. विकासाची संकल्पना जर सत्यात उतरली, तर विकासाचे मॉडेल म्हणून संपूर्ण राज्यात या गावचे नाव ओळखले जाईल.
तालुक्याच्या ठिकाणापासून  ५० कि.मी. व जिल्ह्याच्या ठिकाणापासून १२५ किमी दूर असलेल्या राजगोळी खुर्द या गावचा व्यावहारिक व शैक्षणिक संबंध दहा कि.मी. असणाऱ्या बेळगावशी आल्याने येथे कन्नड बोलीभाषेचा वापर आढळतो. ताम्रपर्णी नदीच्या काठावर असलेल्या गावाला सुपीक व मुबलक जमीन आहे. गावापासून दोन कि.मी. अंतरावरच ताम्रपर्णी व घटप्रभा नदीचे संगम स्थान आहे. १९५३ साली राजगोळी ग्रामपंचायतीची स्थापना झाली. स्थापनेपासून कै. घटग्याप्पा मुगेरी, कै. रामचंद्र यल्लाप्पा भांदुर्गे, जोतिबा निंगाप्पा कडोलकर व गणपतराव रघुनाथराव इनामदार व त्यांचे समकालीन सवंगडे यांच्या शब्दाला किंमत होती. त्यामुळे ३० ते ४० वर्षे गावात कोणत्याही संस्थेची निवडणूक लागली नाही. गडीमध्ये न्यायनिवाडा करणे अशी गावची ओळख आहे. गावचे राजकारण बहुरंगी असले, तरी गावच्या विकासात राजकारण आणले जात नाही. माजी जि. प. सदस्य मल्लिकार्जुन मुगेरी व माजी पं. स. सदस्य दत्तात्रय कडोलकर यांच्यामुळे गावच्या विकासाला सुरुवात झाली. श्री. मुगेरी यांनी जि. प. मधून ७० लाखांची नळपाणी योजना मंजूर करून कार्यान्वितही केली.
गावाला ऐतिहासीक पार्श्वभूमी असून, अनाधिकाळापासून हुबे असलेली ऐतिहासिक गढी आहे. या गढीची तटबंदी ढासळत आहे. पर्यटनाच्यादृष्टीने विकास या गढीचा विकास करण्यास आजही वाव आहे.
पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची गरज आहे. या शिवाय आयटीआय, पॉलिटेक्निक या शिक्षणाची गरज झाल्यास येथील बेळगाव, गडहिंग्लजला जाणारे विद्यार्थी या ठिकाणी थांबू शकतील.
गाव ताम्रपर्णी नदीच्या काठी वसल्यामुळे हिरवागार चारा असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुभती जनावरे पाळली आहेत. गावात एक सेवा संस्था, एक पतसंस्था, चार दूधसंस्था असून, दररोज गावातून पाच हजार लिटर दूध संकलन होते. येथे पाण्याची मुबलक सोय झाल्याने शेतकरी भात, कापूस, याबरोबरच उसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेत आहे. येथील उसाचे सरासरी उत्पादन एकरी ३० टन आहे.
गावापासून दोन किमी अंतरावर हेमरस (ओलम) हा खासगी साखर कारखाना आहे. या कारखान्याला पुरवठा होणारा सर्व ऊस या गावातूनच जातो. मात्र, हेमरस कारखान्यांकडून अद्यापी गावात म्हणावे, तसे विकासाच्यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. हेमरसमध्ये राजगोळी गावाचे २० कर्मचारी असून, त्यांना अद्याप नोकरीत कायम केलेले नाही. गावाला २०० एकर उसाचे क्षेत्र असून सहकारी तत्त्वावर बसवेश्वर संस्थेमार्फत पाणीपुरवठा केला जायचा. १९८२-८३ साली ही पाणी संस्था वारेमाप वीजबील व बँकेच्या जाचक अटीमुळे बंद पडली.


ग्रामस्थांच्या अपेक्षा
घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करून त्याद्वारे वीज निर्मिती किंवा गॅस निर्मिती
बटाटे, रताळी पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग व्हावेत
वसुंधरा पाणलोट क्षेत्रात गावचा समावेश व्हावा
गव्याच्या त्रासापासून सुटका व्हावी
पाझर तलाव व्हावा
ग्रामसचिवालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय व्हावे
क्रीडांगण व्हावे
बस फेऱ्या वाढवाव्यात
विठ्ठल मंदिर
परिसरात सांस्कृतिक
भवन व्हावे


राजकारण विचित्र वळणावर
पुर्वी गावचे इनामदार म्हणून सामाजिक राजकीय किंवा गावच्या विकासात्मक कार्यात आम्ही महत्त्वाची भूमिका निभावली. गावात शब्दाला मान होता. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत गट वाढले, कार्यर्ते वाढले, कोण कुणाचे ऐकेनासे झाले. सध्या ध्येयवाद कमी झाल्यामुळे राजकारण विचित्र वळणावर आले आहे. आमच्या गढीमधील पिंपळाच्या झाडाखाली बसून गावासह परिसरातील न्यायनिवाडे केले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी गाव दत्तक घेतल्यामुळे गावाचा विकास नक्कीच होणार, त्यामुळे गावाच्या विकासात आम्हीही सक्रिय होणार असल्याचे गावचे इनामदार गणपतराव इनामदार यांनी सांगितले.

दुष्काळात
धान्य वाटप
१९७२ साली पडलेल्या दुष्काळात माणसं जगविण्यासाठी कै. घटग्याप्पा मुगेरी व गणपतराव इनामदार यांनी आपल्या घरातील धान्य लोकांना वाटप केल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.


‘हेमरस’कडून अपेक्षा
गावापासून दोन कि.मी. अंतरावर हेमरस साखर कारखाना असून, या कारखान्यांकडून विकासात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जि. प.मधून केलेल्या रस्त्यांची दुर्दशा हजारो वाहनांनी केली आहे. मात्र, त्याची दखल मात्र कारखाना घेत नाही. भाग विकास निधी हा प्रामुख्याने राजगोळी खुर्द गावासाठीच खर्च करावा, अशी मागणी जि. प. सदस्य मलिक्कार्जुन मुगेरी यांनी केली.


ग्रुप ग्रामपंचायत
राजगोळीसह राजेवाडी, गणेशवाडी, चन्नेहट्टी अशी ग्रुपग्रामपंचायत असून, ३८११ अशी लोकसंख्या आहे.
यापैकी पुरुष
१९९८ व स्त्रिया १९१३ इतक्या आहेत.

महिलांची संख्या अधिक
राजगोळी गावात पुरुषापेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने येथे
सर्वसोयीनीयुक्त रुग्णालय होणे गरजेचे आहे. याशिवाय परिसरात एखादा उद्योग उभे राहिल्यास बेकारी कमी होण्यास मदत होणार आहे. ग्रा.पं. इमारत नसल्याने सुसज्ज इमारत व्हावी, अशी मागणी सरपंच कु. वृषाली मुगेरी यांनी केली.

Web Title: The development model of the Rajgoli khurda will be built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.