धनगरवाड्यावर विकासाचा बनाव

By Admin | Updated: May 6, 2015 00:15 IST2015-05-05T21:30:07+5:302015-05-06T00:15:08+5:30

पाण्याच्या योजनेवर राजकारणाचा वरवंटा : गावात येण्यासाठी पक्का रस्ता, अंतर्गत रस्ता, दिवाबत्तीची सोयच नाही

Development of Dhanagarwad | धनगरवाड्यावर विकासाचा बनाव

धनगरवाड्यावर विकासाचा बनाव

मच्छिंद्र मगदूम -सांगरुळ  उपवडे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पश्चिमेकडील डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मठाचा व मारुतीचा धनगरवाड्यावर विकासाचा बनाव सुरू आहे. दोन्ही वाड्यांवर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. पाण्याच्या योजना तीन वर्षे रखडल्याने आजही लोक पाण्यासाठी डोंगरात वणवण फिरत आहेत. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवावेत, एवढीच मागणी येथील नागरिकांतून होत आहे.देशाला स्वातंत्र मिळून आज ६८ वर्षे उलटली, तरीही खेड्यापाड्यांत, डोेंगरदऱ्यांत वसलेल्या वाड्या-वस्त्यांवर विकास मात्र पोहोचला नाही, असेच हे विकासापासून वंचित राहिलेले दोन धनगरवाडे. आजही येथील लोकांना विकास म्हणजे काय? हे माहीत नाही. तीन वर्षांपूर्वी शतकोटी वृक्ष लागवड करण्यासाठी रस्ता करण्यात आला. त्यामुळे दोन वाड्यांवर जाण्यासाठी रस्ता झाला. संपूर्ण रस्ता डोंगरी भागात असल्याने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने रस्ता तुटून गेला आहे. वृक्ष लागवडीचे काम पूर्ण झाल्याने याकडे कुणाचेच लक्ष नाही. धनगरवाड्यावर चारचाकी वाहन घेऊन जायचे झाल्यास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.दरम्यान, येथील लोकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन नेत्यांनी व प्रशासनाने यासाठी निधी मंजूर करून दिला; पण त्याचे कामही ठेकेदाराच्या मर्जीनेच चालले आहे. काम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली, तरी त्याचे पाणी अद्यापही येथील लोकांना मिळालेले नाही. मठाच्या धनगरवाड्यावर विहिरीत मोटार बसविली आहे. साठवणुकीसाठी टाकीही बांधली आहे. ठेकेदाराने बिलेही उचलली आहेत; पण पाण्याचा पत्ताच नाही. निव्वळ राजकीय द्वेषापोटी पाण्याची योजना सुरू केलेली नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र मेटाकुटीस आला आहे.
मारुतीच्या धनगरवाड्याचीही परिस्थिती काय वेगळी नाही. वाड्यावरची पाण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीत बराच कचरा असून, पाण्याला दुर्गंधी येते. त्यामुळे तेथील नागरिक ते पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. आजही येथील लोक पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचाच आधार घेतात. ग्रामपंचायतीने विहिरीतील संपूर्ण पाणी काढून गाळ व कचरा काढून धनगरवाड्याला स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आहे.

पाण्यासाठी डोंगरात वणवण
वसलेल्या मठाचा व मारुतीचा धनगरवाड्यावर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
कित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवावेत, एवढीच मागणी




पाण्याच्या योजना तीन वर्षे रखडल्याने आजही लोक पाण्यासाठी डोंगरात वणवण फिरतात.
धनगरवाड्यावर पाण्याची योजना तातडीने सुरू करावी. तसेच अंतर्गत रस्ते करून दिवाबत्तीची सोय करावी. - संभाजी आडूळकर
(ग्रामस्थ, मठाचा धनगरवाडा)


ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, ती विहीर स्वच्छ करावी. वाड्यावरील विजेचे खांब सडले आहेत. ते पडण्याच्या स्थितीत आहेत. जीवितहानी होण्यापूर्वी ते खांब बदलावेत.
- आंबुबाई मिसाळ (ग्रामपंचायत सदस्या)

Web Title: Development of Dhanagarwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.