विकासकांचा भराव, सर्वसामान्यांच्या उरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:42+5:302021-07-30T04:25:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विकासकाचा भराव, सर्वसामान्यांच्या उरावर, अशी अवस्था लक्षतीर्थ वसाहतमध्ये महापूर स्थितीत पाहावयास मिळत आहे. छोटी-छोटी ...

Developer's fill, on everyone's lap | विकासकांचा भराव, सर्वसामान्यांच्या उरावर

विकासकांचा भराव, सर्वसामान्यांच्या उरावर

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विकासकाचा भराव, सर्वसामान्यांच्या उरावर, अशी अवस्था लक्षतीर्थ वसाहतमध्ये महापूर स्थितीत पाहावयास मिळत आहे. छोटी-छोटी बैठी घरे महापुराच्या पाण्यात बुडालीत, अनेकांचे संसार उघड्यावर पडले. आता नुकसानभरपाई देऊन मनधरणी करण्यापेक्षा पुराचे पाणी दरवर्षी आमच्या घरात घुसणार नाही यासाठी काही तरी ठोस उपायोजना करा... अशी आर्त हाक महापुरात घर-दार बुडालेल्या सर्वसामान्यांनी दिली.

लक्षतीर्थ वसाहत हे पचगंगा नदीकाठची सर्वसामान्यांची वसाहत. कोणी रिक्षाचालक तर कोणी गवंडी, सेंट्रिंग कामगार, हमाल तर कोणी घरबसल्या बिट्या भरणा, मणी भरणा, धुणी-भांडी कामे करून पै-पै जुळवून संसाराचा गाडा हकणारी कुटुंबे होय. हातावरचे पोट असणाऱ्यांचे संसार २०१९ नंतर दुसऱ्यांदा महापुरात बुडाले. महापुराचे पाणी ओसरू लागले तशी आसरा घेण्यासाठी बाहेर गेलेली कुटुंबे आता परतू लागली. घरासमोर खिन्न मनाने डोळ्यात आसवं गाळत नुकसानीचा आकडा मनातच मोजताना दिसत आहेत.

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये लहान-मोठ्या सुमारे १२ ते १५ कॉलन्यांना महापुराचा फटका बसला. घरांचे मोठे नुकसान झाले. पाणी ओसरल्याने घराघरात साफसफाईची कामे सुरू आहेत. पै-पै जमवून घरात सजवलेल्या वस्तू महापुरात खराब झाल्या. भिजलेले फर्निचर, साहित्य उघड्यावर सुकवण्यासाठी ठेवलेले विदारक दृश्य प्रत्येक घरासमोर आहे.

‘ईद’ची रंगरंगोटी गेली पावसात

परिसरात किमान ३५ टक्के मुस्लीम समाज आहे. भर पावसातच ईद सण साजरा झाला. पाठोपाठ महापुराने गाठल्याने सणासाठी घरांची रंगरंगोटी, सजवलेले फर्निचर पाण्यात गेल्याने नुकसान झाले.

धान्यही भिजले

पावसाळा असल्याने अनेकांनी घरात धान्य भरून ठेवले; पण महापुरामुळे त्याचेही नुकसान झाले. ते सुकवण्यासाठी दारात पसरले होते.

धनगर समाज हवालदिल

शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील धनगर समाज मोठ्या संख्येने जिव्हाळा कॉलनी विस्तापित आहे. ही धनगर समाजाची घरे महापुरात धोकादायक बनली.

गुऱ्हाळघरांचे मोठे नुकसान

नदीकाठच्या तीन गुऱ्हाळघरांत पाणी शिरल्याने तेथील सुकलेल्या पाल्याच्या मोठ्या गंज्या पाण्याबरोबर वाहून गेल्या.

लघु उद्योग पडले बंद

विश्वभारती कॉलनी, जिव्हाळा कॉलनीत उत्तरेश्वर पेठेतील चांदी मूर्तीचे कारखाने आहेत. घराघरात बिट्ट्या भरणे, मणी भरणेसह काळ्या बाहुलीत भुसा भरणे आदी कामे केली जातात. ती कामे बंद पडली. चांदी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती सुरू आहेत.

बावीस वर्षांत प्रथमच कॉलन्यात पाणी शिरले. नुकसान झाले असले तरीही तुटपुंजी मदत नको, महापुरावर कायमची उपाययोजना करा. दरवर्षी नुकसान सहन करण्याची आमची परिस्थती नाही.

- मुन्ना शेख, चांदी व्यावसायिक.

रेडझोनमधील बांधकामे, कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेल्या भरावामुळे फुगवटा येऊन आमच्या घरात पाणी शिरले. नुकसानही न भरून निघणारे झाले.

- अस्लम खलिफा,

नदीकाठी बांधकामासाठीच्या भरावामुळे लक्षतीर्थ वसाहतीमध्ये सर्वसामान्यांच्या घरात पाणी शिरले, प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, रेडझोनमधील बांधकामांना परवानगी देऊ नये.

- शिवानी संजय पाटील.

(फोटो पाठवत आहे.)

Web Title: Developer's fill, on everyone's lap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.