देवस्थान जमीन गैरव्यवहार; नामदेव कुंभारकडे चौकशी
By Admin | Updated: July 24, 2016 00:37 IST2016-07-24T00:21:59+5:302016-07-24T00:37:08+5:30
सदस्य, कर्मचाऱ्यांवर संशय : सह्यांचे नमुने पुण्याला पाठविणार

देवस्थान जमीन गैरव्यवहार; नामदेव कुंभारकडे चौकशी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शेतजमीन गैरव्यवहारामध्ये सचिव व सदस्यांच्या बोगस सह्यांद्वारे कागदपत्रे तयार करून शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी येथील एक हजार एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी थंडावलेल्या चौकशीला पुन्हा गती देत पेठवडगाव येथील एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स या कंपनीचा मालक नामदेव कुंभार याच्याकडे शनिवारी कसून चौकशी केली. या गैरव्यवहारामध्ये काही समिती सदस्यांसह कर्मचाऱ्यांचा हात आहे. अशा संशयितांचे सह्यांचे नमुने घेतले असून ते उद्या, सोमवारी पुणे येथील ‘फॉरेन्सिक लॅब’ला पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल प्राप्त होताच ‘त्या’ दोन कंपन्यांच्या मालकांसह दोषींना अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे पश्चिम महाराष्ट्रातील २५ हजार एकर शेतजमीन आहे. त्यापैकी देवस्थानची शाहूवाडीत साडेचार हजार एकर शेतजमीन आहे. ‘सीआयडी’च्या भूखंड गैरव्यवहार चौकशीमध्ये शाहूवाडीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगिरी येथील हजार एकर शेतजमीन देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्यासह समिती सदस्यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबई व पेठवडगाव येथील दोन कंपन्यांच्या नावे चढविण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी देवस्थानचे कर्मचारी शिवाजी साळवी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोन कंपन्यांसह अज्ञात व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हा गैरव्यवहार दि. १६ आॅगस्ट २०१२ ते ३१ आॅगस्ट २०१५ या मुदतीत देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात घडला आहे. त्या कालावधीत समिती बोर्डावर असणाऱ्या सदस्य व कर्मचाऱ्यांपैकीच काहीजणांनी हे धाडस केल्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. पोलिसांनी आतापर्यंत गुन्ह्यांशी संबंधित असणाऱ्या समिती सदस्य व कर्मचारी अशा पंधराजणांचे जबाब नोंदविले आहेत. शनिवारी पेठवडगाव येथील एन. एस. कुंभार याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यांपैकी चार-पाच सदस्य व कर्मचारी संशयित आहेत. आणखी काहीजणांवर संशय असून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
खनिज साठ्यासाठी ‘कारभाऱ्यांची फिल्डिंग
उदगिरी येथे खनिज साठा मोठ्या प्रमाणात आहे. भविष्यात उत्खनन करून त्याचा फायदा उठविण्यासाठी देवस्थानची हजारो एकर जमीन ‘त्या’ दोन कंपन्यांच्या नावाखाली लाटण्याचा प्रयत्न समितीमधील काही मातब्बर सदस्य करीत आहेत. पोलिसांनी नामदेवकडे चौकशी केल्यानंतर या गैरव्यवहारातील पडद्यामागचे ‘कारभारी’ उजेडात येणार आहेत.
कोण हा एन. एस. कुंभार ऊर्फ नामदेव?
देवस्थान समिती शेतजमीन गैरव्यवहारात एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स, पेठवडगाव या कंपनीचा सहभाग असल्याचे स्पष्ट होताच पेठवडगावमध्ये खळबळ माजली. या कंपनीचा मालक नामदेव कुंभार याचा पारंपरिक व्यवसाय कुंभारकीचा आहे.
१९८८ मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री शिवाजीराव देशमुख यांच्या नावाखाली तो शासकीय जमिनी नावावर चढविण्याची कामे घेत होता. त्यामुळे त्याचा जमीन खरेदी-विक्री व्यवसायात हातखंडा आहे. काही वर्षांपूर्वी त्याने पेठवडगाव येथील बोगस धनादेशाद्वारे ‘महालक्ष्मी’ सिनेमागृह खरेदी करून शिक्षकाची फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे.
तो महिन्यातून एक-दोन वेळाच घरी येतो. याठिकाणी त्याची पत्नी, मुलगा, सून राहण्यास आहे. व्यवसायाने कुंभार आणि दोन खोल्यांच्या साध्या घरात राहणारा नामदेव हा स्वत:च्या नावे ट्रेडर्स अँड मिनरल्स कंपनी काढून उदगिरी येथील देवस्थानची हजारो एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न करतो, यासंबंधी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
देवस्थान समिती शेतजमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर आहे. त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
- अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा