संघटीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:56+5:302021-07-05T04:15:56+5:30
कोल्हापूर : व्यापाऱ्यांना जगण्यासाठी व्यापार सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. व्यापार सुरु करणे हा आपला अधिकार आहे. मात्र, यासाठीसुद्धा व्यापाऱ्यांची ...

संघटीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार
कोल्हापूर : व्यापाऱ्यांना जगण्यासाठी व्यापार सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. व्यापार सुरु करणे हा आपला अधिकार आहे. मात्र, यासाठीसुद्धा व्यापाऱ्यांची संघटीत शक्ती आवश्यक आहे. यापुढील काळातही व्यापाऱ्यांनी संघटीत राहण्याचा निर्धार रविवारी येथे केला.
महाव्दार रोड व्यापारी संघ, सराफ व्यापारी संघ तसेच ज्योतिबा रोड, ताराबाई रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी संयुक्तपणे महाव्दार रोड येथे सभा आयोजित केली होती. या सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यावेळी म्हणाले, जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना समजून घेऊन व्यापार सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. पालकमंत्री, आमदारांनी प्रयत्न केले आहेत. पण अद्यापही शासनाने निर्णय न घेणे हे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली आहे, व्यापाऱ्यांची आर्थिक घडीही विस्कटली आहे. या परिसरातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला महाराष्ट्र चेंबरच्यावतीने पूर्ण पाठिंबा देऊन आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, सलग तीन महिन्यांपासून लॉकडाऊन केल्याने व्यापाऱ्यांवर अन्याय झाला आहे. वीज, पाणी, घरफाळ्यात सवलत दिलेली नाही. याउलट दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. हे चुकीचे आहे. जीएसटीचा करही सुरूच आहे. मग दुकाने का बंद ठेवायची? आता दुकानदार, व्यापाऱ्यांचा संयम सुटला आहे. ते आज (सोमवार)पासून दुकाने सुरू करतील. गेल्या दोन आठवड्यात शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी सरसकट दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड म्हणाले, आता व्यापार सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. सर्व व्यापाऱ्यांचेही असेच म्हणणे आहे.
माजी महापौर सुनील कदम म्हणाले, शहराच्या विकासासाठी सर्व व्यापार सुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे दुकाने सुरू करावीत. आमदार, खासदारांनी दुकानदारांच्या बाजूने उभे राहावे.
माजी नगरसेवक किरण नकाते म्हणाले, लॉकडाऊन काळातील घरफाळा, पाणीपट्टी व वीजबिल माफीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाव्दार रोड व्यापारी संघाचे अध्यक्ष शामराव जोशी यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी व व्यापारावर आलेले संकट हा जीवन-मरणाचा प्रश्न बनला असल्याचे सांगितले.
चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव जयेश ओसवाल, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे सचिव रंजित पारेख, संचालक माणिक पाटील -चुयेकर, अनिल पिंजानी, जयंत गोयानी, श्याम बासरानी, राहुल नष्टे यांच्यासह गुजरी, भेंडी गल्ली, ज्योतिबा रोड, महाव्दार रोड, ताराबाई रोड, बाबुजमाल परिसरातील व्यापारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : ०४०७२०२१-कोल- गुजरी कोपरा सभा
कोल्हापुरातील गुजरी येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या कोपरा सभेत रविवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कुलदीप गायकवाड, शामराव जोशी, संजय शेटे, किरण नकाते, जयेश ओसवाल, आदी उपस्थित होते.