पुरोगामी विचारवंतांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार
By Admin | Updated: November 25, 2015 00:54 IST2015-11-25T00:49:49+5:302015-11-25T00:54:25+5:30
संघर्ष यात्रांचा समारोप

पुरोगामी विचारवंतांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार
कोल्हापूर : देशातील सांस्कृतिक बहुविविधता नष्ट करायचा प्रयत्न करणाऱ्या मूलतत्त्ववादी शक्तींचा आम्ही सर्व ताकदीनिशी प्रतिकार करू. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांचे वारसदार म्हणून त्यांचे कार्य आम्ही पुढे नेऊ. त्यासाठी जीवन समर्पित करू, अशी प्रतिज्ञा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथे केली. पुरोगामी विचारवंतांचे खूनसत्र थांबले पाहिजे. त्यांचे मारेकरी व सूत्रधारांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठीच्या संघर्ष यात्रांचा समारोप झाला.
सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनातर्फे आयोजित संघर्षयात्रा, आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनची ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ संघर्षयात्रा सकाळी अकरा वाजता सागरमाळ येथे एकत्रित आल्या. येथे कॉ. पानसरे यांच्या निवासस्थानासमोर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी प्रतिज्ञा दिली. ‘लोकभूमी’ मासिकाच्या कॉ. पानसरे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर, उमा पानसरे, मेघा पानसरे, स्मिता पानसरे, बन्सी सातपुते, कॉ. भालचंद्र कानगो, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, तुकाराम भस्मे, किशोर जाधव, एस. बी. पाटील, सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, आदी उपस्थित होते. दरम्यान, ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ने २२ नोव्हेंबरपासून कॉ. पानसरे यांच्या जन्मभूमी कोल्हारपासून संघर्षयात्रा सुरू केली. तेथून ही यात्रा मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील ताराराणी चौकात आली. तिचे स्वागत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले. (प्रतिनिधी)