प्रत्येक ग्रामपंचायतीवर समितीचा झेंडा फडकविण्याचा निश्चय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:24+5:302020-12-06T04:27:24+5:30
बेळगाव : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीती आखण्यासंदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित ...

प्रत्येक ग्रामपंचायतीवर समितीचा झेंडा फडकविण्याचा निश्चय
बेळगाव : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीती आखण्यासंदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात प्रत्येक गावामध्ये वार्डनिहाय कमिटी नेमून उमेदवार निवडण्याबरोबरच त्याला बहुमताने विजयी करून प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्याचा निश्चय आपण सर्वांनी करायचा आहे.
यावेळी व्यासपीठावर चिटणीस एल. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, जि. प. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, आदी उपस्थित होते. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक गावातील वॉर्डांमध्ये समितीचा उमेदवार उभा करून निवडणूक जिंकण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या अनुषंगाने उमेदवार निवडीसाठी गाव पातळीवर वॉर्डनिहाय निवड समिती स्थापण्याची सूचना करून निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन मनोहर किणेकर यांनी केले.
यावेळी जि. प. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, माय मराठीसाठी कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक जिंकली पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीवर समितीचा भगवा ध्वज फडकला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागून समितीचे वर्चस्व गावोगावी प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसली पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण सज्ज झाले पाहिजे. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने संतोष मंडलिक, मनोहर संताजी, कृष्णा हुंदरे, ॲड. सुधीर चव्हाण, बी. डी. मोहनगेकर, एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, अरुण कानूरकर, ॲड. एम. जी. पाटील, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.