लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

By Admin | Updated: July 30, 2015 00:27 IST2015-07-29T23:53:19+5:302015-07-30T00:27:25+5:30

इचलकरंजीत सायझिंग कामगारांचे आंदोलन : ए. बी. पाटील यांची कामगार मेळाव्यात घोषणा

Determination to continue the fight | लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित वेतनाची अंमलबजावणी होईपर्यंत सायझिंग-वार्पिंग कामगारांचा लढा सुरूच राहील, असा निर्धार कामगार नेते ए. बी. पाटील यांनी कामगार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.गेल्या आठवडाभराच्या संपानंतर मंगळवारी (दि.२८) मुंबई येथे कामगार मंत्र्यांकडे झालेल्या बैठकीचा वृत्तांत सांगून पुढील निर्णय घेण्यासाठी बुधवारी येथील थोरात चौकामध्ये बोलविण्यात आलेल्या सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या मेळाव्यामध्ये पाटील बोलत होते. शासनाने कामगार संघटनेला चर्चेला बोलवून संप कायदेशीर असल्याचा शिक्कामोर्तब केला असल्याचे सांगून ते म्हणाले, आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुंबईच्या बैठकीमध्ये बोलताना या संपामुळे शहरात सर्व उद्योगधंदे बंद पडण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच यंत्रमाग उद्योगाप्रमाणे पीस-रेटवर सायझिंग उद्योगामध्येसुद्धा वेतन असले पाहिजे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आमदार हाळवणकर हे सायझिंग कामगारांना औषध म्हणून विष पाजत असल्याची टीका पाटील यांनी केली.
उच्च न्यायालयामध्ये सुधारित किमान वेतनाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे कामगारांच्या मागण्या कायदेशीर असून, संपसुद्धा कायदेशीरच असल्याचे सांगत हाळवणकर हे मालक धार्जिणे असल्याचा आरोप पाटील यांनी केला. सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी होईपर्यंत आपला लढा पुढे चालूच राहील. आज, गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी शेवटी केली. कामगार मेळाव्यात सुभाष निकम, आनंदराव चव्हाण, कृष्णात कुलकर्णी, चंद्रकांत गागरे, आदींची भाषणे झाली. १ आॅगस्टला मुंबई येथे सर्व उद्योगांतील कामगारांच्या मोर्चालासुद्धा सक्रिय प्रतिसाद देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Determination to continue the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.