पहिली प्रवेशाचे वय निश्चित
By Admin | Updated: January 23, 2015 23:35 IST2015-01-23T21:26:12+5:302015-01-23T23:35:50+5:30
आदेशाच्या अंमलबजावणीची वर्षे अशी...

पहिली प्रवेशाचे वय निश्चित
कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेशासाठीचे विद्यार्थ्यांचे वय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे संबंधित शाळांना दिलासा मिळाला आहे. शिवाय खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याची माहिती महासंघाचे शहराध्यक्ष संतोष आयरे यांनी पत्रकाद्वारे दिली.राज्यातील शाळांमध्ये २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकालाच प्रवेश द्यायचा यावर निर्णय होणार होता. या निर्णयामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांवर ज्या ठिकाणी पाच वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकाला प्रवेश दिला जात होता अशा शाळांवर पटसंख्येबाबत मोठ्या अडचणी निर्माण होणार होत्या. सहा वर्षांची अट जर शासनाने लागू केली, तर पुढील सात वर्षे शाळेमध्ये टप्प्याटप्याने पटसंख्येची अडचण निर्माण होणार होती. त्यावर राज्यात सर्वप्रथम कोल्हापुरातून खासगी शिक्षक महासंघाने आवाज उठविला. शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे पुढील चार ते पाच वर्षांपर्यंत टप्प्याटप्याने प्रवेशासाठीचे वय वाढवावे, अशी मागणी केली. त्यानुसार पुढील चार वर्षांसाठी प्रवेशाचे वय निश्चित करणारा आदेश शासनाने काढला असल्याची माहिती पत्रकाद्वारे आयरे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
आदेशाच्या अंमलबजावणीची वर्षे अशी...
पाच वर्षे पूर्ण : २०१५-१६
पाच वर्षे व चार महिने पूर्ण : २०१६-१७
पाच वर्षे व आठ महिने पूर्ण : २०१७-१८
सहा वर्षे पूर्ण : २०१८-१९